देश-विदेशातील पत्रकारितेला लढ्याच्या इतिहासाची पार्श्वभूमी - - जतीन देसाई ज्येष्ठ पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान

Date: 2025-02-28
news-banner


            भारतातील पहिले वर्तमानपत्र २९ जानेवारी १७८० मध्ये बेंगाल गॅझेट या नावाने प्रसिद्ध झाल्याचे सांगून, ब्रिटिश गव्हर्नर वॉरन हेस्टींग्ज याच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आयर्लंडमधील पत्रकार जेम्स हिकी ह्याने हे वर्तमानपत्र सुरू केले होते. या वर्तमानपत्रामुळे अस्वस्थ झालेल्या वॉरन हेस्टिंग्जने त्याच वर्षी काही पत्रकारांना हाताशी धरून इंडियन गॅझेट नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. या इंडियन गॅझेटचा सर्व खर्च सरकारतर्फे करण्यात येत होता. आजच्या काळात आपण जी गोदी मीडिया पाहतो त्याचा इतिहास हा या इंडियन गॅझेट पासून सुरु झाल्याचे ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी सांगितले.
 ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पालघर जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, दै.लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र नाईक, दै.पुढारीचे पत्रकार हनिफ शेख, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी सचिन जगताप यांना जतीन देसाई यांच्या हस्ते यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे यांच्या अंतरंगी डोकावताना ह्या ग्रंथास तसेच प्रा.विवेक कुडू यांच्या चार चपटे मासे या कथासंग्रहास पुरस्कार  मिळाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. 
            स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. आंबेडकर आदींनी स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणांसाठी देशात मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्र सुरू केल्याचे सांगताना, वर्तमानपत्रांनी भारताप्रमाणेच पाकिस्तानातही वैशिष्ट्‌यपूर्ण भूमिका बजावल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारत आणि इंदिरा गांधी यांच्या योगदानाची आपणास माहिती असते, परंतु एका इंग्रज पत्रकाराने पाकिस्तानमध्ये राहून केलेल्या पत्रकारितेचीही यामागे मोठी भूमिका होती याची फारशी कोणाला कल्पना नसल्याचे सांगून त्यांनी याबाबतचा इतिहास थोडक्यात उपस्थितांसमोर ठेवला.  
 १९४८ ला पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तेथे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पश्चिम पाकिस्तान मधील पश्तून, पठाण व पंजाबी लोकांना बंगाली लोकांच्या हातात सत्ता द्यायची नसल्याने त्यावेळी बांगलादेशामध्ये मोठा नरसंहार होऊन ३० लाख लोकांची हत्या करण्यात आली. बीबीसी वृत्तवाहिनीने याबाबत ढाक्याच्या रस्त्यावर केवळ मृतदेह आणि फिरणारे कुत्रे दिसतात अशी बातमी केली होती. याला प्रतिवाद म्हणून पाकिस्तानच्या याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये सर्व आलबेल आहे हे जगाला दाखवण्यासाठी दहा पत्रकारांचा गट बांगलादेशमध्ये पाठवला. दहापैकी नऊ जणांनी पाकिस्तानच्या बाजूने वार्तांकन केले. मात्र अँथनी नावाचा इंग्रज पत्रकार  खोट  लिहिण्यास तयार नव्हता. त्याच्यावरील दबाव वाढत गेल्यावर त्याने सर्वप्रथम आपले कुटुंब पाकिस्तानातून लंडन येथे हलविले. आपले कुटुंब लंडनमध्ये पोहोचल्यानंतर  त्यांने अफगाणिस्तान मार्गे इंग्लंडमध्ये प्रवेश केला आणि बांगलादेश येथील नरसंहाराचे संपूर्ण  वार्तांकन  इंग्लंडमधील एका वृत्तपत्रामधून केले. त्यांच्या या बातमीमुळे संपूर्ण अमेरिका आणि युरोपमध्ये खळबळ माजली. याच बातमीचा आधार घेत इंदिरा गांधी यांनी युरोपमध्ये जाऊन बांगलादेश येथील परिस्थितीचे वास्तव जगासमोर आणले आणि भारताने बांगलादेश निर्मितीमध्ये पुढाकार घेतला. आजच्या काळात आपण जी गोदी मीडिया पाहतो त्याचा इतिहास हा या इंडियन गॅझेटपासून सुरु झाल्याची टीप्पणी देसाई यांनी यावेळी केली. 
         १८५७ च्या बंडालाही मोठ्या प्रमाणात माध्यमाची साथ होती. त्याकाळी  भारतात उर्दू बोलणार्‍यांची आणि वाचणार्‍यांची संख्या प्रचंड  असल्याचे सांगत  उर्दू बद्दल आज अनेक गैरसमज आहेत, परंतु धर्म  आणि भाषा यांचा काही संबंध नसल्याचे नमुद करत उर्दू ही या देशाची भाषा होती, त्यामुळे स्वातंत्र्यापर्यंत भारतात ४१३ उर्दू वर्तमानपत्रं होती. फाळणीनंतर त्यांची संख्या दोनशेच्या आसपास होती असा दाखलाही देसाई यांनी यावेळी दिला. १८५७ च्या बंडात सत्ताधार्‍यांविरोधात लिहिणार्‍या मौलवी मीर बाकीर  नावाच्या संपादकाला ब्रिटिशांनी फाशी दिली होती. सत्ताधार्‍यांनी हत्या केलेला भारतातील हा पहिला पत्रकार असल्याची माहितीही  देसाई यांनी यावेळी  दिली.
          वर्तमानपत्रांनी सत्ताधार्‍यांच्या विरोधात बोलणं अपेक्षित असते. म्हणजेच, वर्तमानपत्र किंवा वर्तमानपत्राची भूमिका नेहमी विरोधी पक्ष नेत्यासारखी असायला हवी असे सुचवत जातीन देसाई यांनी या पृष्ठ्यर्थ आणीबाणी काळात इंडियन एक्सप्रेसचे मालक रामनाथ गोएंका यांच्याबाबत घडलेल्या एका किस्स्याचे उदाहरण दिले. आणीबाणी काळात एका कार्यक्रमात एका मुख्यमंत्र्यांनी गोयंका यांना तुमचा पत्रकार खूप चांगला असून अतिशय चांगला लिहितो असे सांगितले. ते शांतपणे ऐकून घेऊन दुसर्‍या दिवशी गोएंका यांनी त्या पत्रकाराची नेमणूक कार्यालयातील कामकाजासाठी करताना, तुमचा पत्रकार वाईट आहे तो आमच्याबद्दल अतिशय वाईट लिहितो असे  मुख्यमंत्र्यांनी सांगायला  हवे असा वार्ताहार  मला हवा असे  त्याला सुनावले होते. गोएंका यांनी त्यावेळी घेतलेली  भूमिका हीच खरी पत्रकारिता असून अशा पत्रकारितेची आज गरज असल्याचे प्रतिपादन जतीन देसाई यांनी केले.
        पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात पालघर जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, पाणी,रस्ते आदि विविध प्रश्नांना वाचा फोडण्यात पत्रकारांनी आजवर मोठी कामगिरी केल्याचे सांगून यापुढेही पत्रकार आपली भूमिका पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला.तर उपाध्यक्ष श्याम आटे यांनी जिल्हा निर्मितीत जिल्ह्यातील पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.देसाई यांचा परिचय ज्येष्ठ पत्रकार समीर मणियार यांनी करून दिला तर आभार पंकज दामोदर राऊत व सुत्रसंचालन निखील मेस्री व संतोष चुरी यांनी केले.

Leave Your Comments