जिल्हा परिषदेसह सात पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हाती

Date: 2025-02-28
news-banner


 पालघर जिल्हा परिषदेसह जिल्हा परिषद अंतर्गत पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वसई पंचायत समितीचा कालावधी संपुष्टात येत असल्याने जिल्हा परिषदचा कारभार अध्यक्षांकडून प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तर उपरोक्त प्रत्येक पंचायत समितीचा कारभार त्या त्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. १५ जानेवारी रोजी ग्रामविकास विभागाने यासंबंधीची अधिसूचना जाहीर केली आहे. पालघर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ १७ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे तर उपरोक्त सर्व पंचायत समित्यांचा कार्यकाळ १४ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला आहे.
 राज्य निवडणूक आयोगाने आपल्या ४ फेब्रुवारी २०२२ व १८ डिसेंबर २०२४ या पत्रांन्वये शासनाला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे कळविले असून, या पाश्र्वभूमीवर मुदत संपणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकाची नेमणूक करण्याची सूचना केली असून त्याअन्वये प्रशासकीय अधिकारी नेमण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाने आपल्या उपरोक्त आदेशात म्हटले आहे. ग्रामविकास विभागाच्या या आदेशामुळे जिल्हा परिषदेवरील 
लोकप्रतिनिधीची सत्ता १७ फेब्रुवारी २०२५ पासून संपुष्टात येत असून आता सर्व कारभार प्रशासनाच्या म्हणजेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या हाती आलेला आहे. पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून गेली दोन वर्ष वर्षे प्रकाश निकम हे काम पाहत आहेत. तत्पूर्वी वैदेही वाढाण तसेच भारती कामडी यांनी हे पद भूषवले आहे. जिल्हा परिषदेचा पाच वर्षासाठीचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२० पासून सुरू झाला होता.ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अध्यक्ष म्हणून प्रकाश निकम यांचा कार्यकाळ सर्वाधिक राहिला.

Leave Your Comments