दांडेकर महाविद्यालयाच्या उत्कंठा युवा महोत्सवात विवा महाविद्यालय सर्वोत्तम

Date: 2025-03-25
news-banner


                वारकर्‍यांची शिस्त, त्यांची नियमितता आणि त्यांची निरलसता अंगी बाणवल्यास यशाचा मार्ग निश्चितपणे सुकर होईल, म्हणूनच जीवनात पुढे जाण्यासाठी वारकर्‍यांचे गुण जोपासण्याची आवश्यकता असल्याचा सलॢा सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सी. ए. सचिन कोरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आयोजित उत्कंठा या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे उद्‌घाटन कोरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी बोलत होते. या ”उत्कंठा” युवा महोत्सवातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून विरार येथील विवा महाविद्यालयास गौरविण्यात आले.  महोत्सवातील विविध १४ स्पर्धामध्ये  पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयासोबतच सिल्वासा आणि मुंबईतील महाविद्यालयांनी सुद्धा आपला यशस्वी सहभाग नोंदविला. 
 सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि स्वत:चा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी ”उत्कंठा” युवा महोत्सवाच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण केले असून, यंदाच्या या  युवा महोत्सवात वारीचा विषय केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगाने  विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर वारीमय केला होता.  या युवा महोत्सवाचे पूर्ण नियोजन आणि आयोजन दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले.  अशा प्रकारच्या महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव तर मिळतोच पण त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, नियोजन करणे, समन्वय साधणे, आयोजन करणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य आत्मसात करता येतात, अशी भावना विद्यार्थी प्रतिनिधी सायली शिंदे आणि सोहम घरत यांनी व्यक्त केली.  
  मागील १२ वर्षात  विविध युवा महोत्सवात दांडेकर महाविद्यालयाने   मुंबई विद्यापिठासह राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयाचे सशक्त दावेदार म्हणून नावलौकीक मिळविला आहे. ज्यांच्यामुळे या प्रयत्नांचा, यशाचा श्रीगणेशा झालं ते पहिल्या उत्कंठा महोत्सवाचे माजी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. या सर्वांचे कौतुक करताना उत्कंठा युवा महोत्सव ही या महाविद्यालयाची एक सांस्कृतिक चळवळ म्हणून मान्यता पावत आहे, असे उद्‌गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी याप्रसंगी काढले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय हे यजमान महाविद्यालय असल्याने आणि सर्व विद्यार्थी हे आयोजनामध्ये व्यस्त असल्याने ते या स्पर्धेमध्ये सहभागी नव्हते. हा युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. मेहश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रेय मिश्र, प्रा.तेजस चौधरी प्रा. मकसूद मेमन, प्रा. हर्षल चौधरी, प्रा.संतोष चुरी, प्रा. प्रकाश चाबके, प्रा. हिमांशू पाटील, मनीष पाटील तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सायली शिंदे, सोहम घरत, सुस्मित तावडे, निधी मोरे अशा जवळपास ४५ विद्यार्थ्यांच्या समूहाने अथक परिश्रम घेतले.

Leave Your Comments