*जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात अशा होणार लढती :
पालघर मतदारसंघ : पक्ष बदलूला मतदार पुन्हा संधी देणार का ?*



* पालघर विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेना शिंदे पक्षाचे राजेंद्र गावित विरुद्ध महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जयेंद्र दुबळा अशी सरळ लढत आहे.दोन्ही उमेदवारांनी प्रचार रॅली आणि गावोगावी भेटीद्वारे आपल्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. राजेंद्र गावित आपल्या २०वर्षाच्या कार्यकाळातील केलेल्या कामांची आठवण करून देत मतदारांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.पालघर मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा संकल्प देखील त्यांनी जाहीर केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पालघर येथील सभेने तसेच विधानपरिषद उपसभापती नीलम गोर्हे यांनी घेतलेल्या महिला मेळाव्यामुळे महिला मतदारांच्या पाठिंब्याची अपेक्षा ते बाळगून आहेत. मात्र किनारपट्टीवरील भरोशाच्या मच्छीमार मतदारांच्या सध्याच्या नाराजीमुळे ते काहीसे अस्वस्थ असावेत. वाढवण बंदर व अलीकडे झालेल्या मुरबे बंदराच्या घोषणेमुळे मच्छीमार वर्गामध्ये संतापाची लाट पसरली असून r कृती समितीने देखील वाढवण आणि मुरबे बंदराचा उल्लेख करत महायुतीचा पराभव करून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केल्यामुळे गावीतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.या नाराजीमुळेच गावित कुठेही वाढवण बंदर किंवा मुरबे बंदर आणल्याचा उल्लेख करत नाहीत किंवा त्यांचे पदाधिकारी देखील याचा उल्लेख टाळतात.माहीम परिसरात टेक्स्टाईल पार्क प्रकल्पामुळे देखील मतदारांमध्ये अशाच प्रकारची नाराजी आहे. माहीम, केळवा, केळवा रोड हा पट्टा बागायतीसाठी तसेच समुद्रकिनार्यावरील पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.हा समृद्ध असा परिसर असल्याने, इथल्या सर्व बागायतदारांनी आपल्या जमिनी स्वत:कडे राखून ठेवलेल्या आहेत.अशा परिस्थितीत प्रचंड प्रदूषण करणारा प्रकल्प हजारो एकर जमिनीवर होणार असल्याने हा परिसर प्रदूषित होईल.तसेच या प्रकल्पाला लागणार्या मोठ्या प्रमाणावरील पाण्यामुळे इथला शेतकरी बागायतदार सिंचनासाठीच्या पाण्यापासून वंचित राहील अशीही भीती निर्माण झाली आहे. हे तिन्ही प्रकल्प गावीतांसाठी एक प्रकारे गळ्यातील हाडूक बनून राहिलेले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत या मतदार संघातून एकत्रित शिवसेना व भाजपा युतीचे शिवसेना पक्षाचे श्रीनिवास वनगा हे निवडून आले होते. त्यांनी पक्ष फुटीनंतर शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला. सुरतला जाताना शिंदेसोबतची आमदार मंडळी तलासरी येथे वनगा यांच्या घरीच थांबली होती. मात्र याच वनगा यांना उमेदवारी देताना मात्र डावलण्यात आले त्यामुळे वनगांचे रडणे सार्या जगाने पाहिले. वनगा यांना त्यावेळी ६८ हजार ४० (५२.५८) तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे योगेश नम यांना २७ हजार ७३५( २१.४३) इतकी मते मिळाली होती.याच बरोबरीने मनसेने १२८१९ (९.९१), वंचित बहुजन आघाडीने ११४६९ (८.८६) तर बसपाने २१९४( १.७)मते मिळवली होती. नोटा साठी ७१३५ (५.५१)मतदारांनी बटन दाबले होते तर २०२४ च्या निवडणुकीत पालघर मतदारसंघात महायुतीला ९३ हजार ५९१ (४७.०६) व महाविकास आघाडीला ६४ हजार ३५२ (३२.३६) व बहुजन विकास आघाडीला २३ हजार ५३० (११.८३) इतकी मते मिळाली होती. महायुती व महाविकास आघाडी यांच्यामधील मतांचे अंतर लोकसभा निवडणुकीत २९ हजार २३९ इतके होते.त्या निवडणुकी बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात होता. त्यांना २३ हजार ५३०मते पडली होती. बहुजन विकास आघाडीने यावेळी जयेंद्र दुबळा यांना पाठिंबा जाहीर केल्याने बविआची मते महाविकास आघाडीकडे वळतील. त्यामुळेही जयेंद्र दुबळा यांचे पारडे जड होणार आहे. मागील निवडणुकीत किनारपट्टीवरील मतदारांचा फटका मविआला बसला होता. मात्र यावेळी ते चित्र पालटल्याचे दिसते.याचाही लाभ जयेंद्र दुबळा यांना होण्याची शक्यता आहे यावेळी या दोन उमेदवारांव्यतिरिक्त अन्य नऊ मिळून ११ उमेदवार रिंगणात आहेत.
या मतदारसंघात २०१९ विधानसभा निवडणूकीत १ लाख २९ हजार ०८६(४७.११ टक्के) तर २०२४ लोकसभा निवडणूकीत ०१ लाख ९८ हजार ८५१ (७०.३४ टक्के) इतके मतदान झाले होते.३२४ मतदानकेंद्र असलेल्या या मतदारसंघाची मतदारसंख्या ०२ लाख ९८ हजार ५७९ इतकी असून यामध्ये पुरुष १ लाख ४९ हजार ०९० तर महिला १ लाख ४९ हजार ४६८ अशी विभागणी आहे.