पालघर नगरपरिषद : अल्याळी रस्त्याचे काम :
वैशिट्यपूर्ण योजनेच्या निधीचा चुकीचा वापर ?
पालघर नगरपरिषद अंतर्गत अल्याळी हद्दीतील हिंदवी मैदान ते रीगल बुककंपनी पर्यंतचा तब्बल ०२ कोटी ७७ लाख खर्चाचा रस्ता चर्चेचा विषय बनला असून पाच ते सहा फूट पेक्षा जास्त खोदाई आणि त्यानंतर आजूबाजूच्या जमिनीपासून तीन ते चार फूट उंच जाणारा रस्ता नक्की कोणाकरता बनवला जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने या रस्त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. मात्र अशी मान्यता देताना हा रस्ता गुरुचरण म्हणजे शासकीय जमिनीतून जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या किंवा महसूल विभागाच्या लक्षात आले नाही का ? आणि असल्यास महसूल विभागाची या रस्त्याला परवानगी आहे असे गृहीत धरले आहे का हाही प्रश्न यातून निर्माण होतो. हा रस्ता ज्या भागातून जात आहे त्या भागात पावसाळ्याच्या काळात वरून येणारे पाणी वाहून जाण्याचा मार्ग आहे. आता याच भागात रस्ता बनवल्यास पावसाळ्यातून येणारे पाणी याच रस्त्यावरून वाहत राहील आणि हा रस्ता डांबरीकरण असल्याने पावसाळ्यात हा रस्ता पावसाचे पाणी वाहून उखडला जाईल ही बाब ह्या रस्त्याच्या आराखडा बनवणार्याच्या लक्षात आली नव्हते का हाही प्रश्न आहे. नाला प्रवाहास अडथळा होईल असे काम करू नये अशी अट मजिप्राने तांत्रिक मंजुरी देताना ठेवलेली आहे.ह्या अटीकडे परिषदेने दुर्लक्ष केले आहे का?
मुळात ज्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या रस्त्याचे अंदाज पत्रक तयार केले आहे. त्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन तिथली परिस्थिती पाहून रस्त्याचा अंदाजपत्रका आराखडा तयार केला आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो. सहा फूट इतका भराव करून त्यावर खडी आणि डांबरीकरण असा हा रस्ता बनत आहे. साहजिकच या रस्त्यावर होणारी वाहतूक लक्षात घेऊन त्याप्रमाणे रस्त्याचा आराखडा बनवला गेला आहे का हाही प्रश्न आहे. हा रस्ता पुढे जुना शिरगाव
सातपाटी रस्त्याला मिळतो. असाच एक रस्ता मॅगी कट कंपनीच्या बाजूने ग्रामपंचायतीने व त्यानंतर राजेंद्र गावित यांच्या स्थानिक विकास निधीतून बनवला असून हा रस्ता अस्तित्वात आहे. हा रस्ताही जुन्या शिरगाव सातपाटी रस्त्याला जाऊन मिळतो. असे असताना पुन्हा नवीन रस्त्याचे प्रयोजन काय आणि त्यावर ०३ कोटी इतका खर्च करून नगरपरिषदेला नेमके काय साधायचे आहे. मजिप्रने या रस्त्यासाठी ०२ कोटी ७६ लाख ९९ हजार २६८ रु.किमतीचे अंदाजपत्रक तयार केले आहे.जिल्हा प्रशासनाने देखील याच रकमेला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. प्रसिध्द झालेल्या निविदांमध्ये मात्र ०२ कोटी २९ लाख ११ हजार ७२१ ही अंदाजपत्रकीय किंमत दर्शविली आहे.ही तफावत का ?या रस्त्यासाठी मुरूम उपलब्ध व्हावा म्हणून महसूल विभागाने अल्ल्याळी भागातच तलाव खोदून मुरूम काढण्याची परवानगी दिली आहे. याच भागात महसूल हद्दीतच मोठा तलाव अस्तित्वात असताना पुन्हा नवीन तलाव खोदाईस परवानगी देण्याचे प्रयोजन काय? नगरपरिषदेला शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हा म्हणून हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. अल्याळी येथिल सदर रस्त्याचे काम वैशिष्ट्यपूर्ण काम कसे होऊ शकते?अशा प्रकारे निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग नगरपरिषदेने करणे अपेक्षित असताना अशा बाबींवर बाबींवर तीन कोटी इतका खर्च केला जातो ही आश्चर्याचे बाब आहे.