जिल्ह्याच्या विकासासाठीचा १४७ कोटीहून अधिक निधी २२ महिने उलटल्यानंतरही खर्च झालेला नाही
जिल्हा नियोजन मार्फत पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजना अंतर्गत दिल्या जाणार्या निधीपैकी मोठा निधी २२ महिने उलटूनही खर्च झाला नसल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सादर माहितीतून समोर आलेले आहे.जिल्ह्याला २३-२४ (आर्थिक वर्ष ०१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४) साठी ५८० कोटी १२ लाख ८ हजार इतका निधी उपलब्ध झाला होता. २२ महिन्यानंतर यापैकी जानेवारी २०२५ अखेर केवळ ४३२ कोटी ६० लाख ७९ हजार इतकाच खर्च झालेला आहे. याचा अर्थ १४७ कोटी ५१ लाख २९ हजार इतका निधी २२ महिने उलटूनही खर्च झालेला नाही.
२०२३- २४ मध्ये जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटकाकरिता १४ कोटी इतका निधी उपलब्ध झाला होता. यापैकी केवळ पाच कोटी ९३ लाख ४७ हजार म्हणजेच ४२.३९ टक्के इतकाच निधी जानेवारी २५ अखेर खर्च झाला आहे.आदिवासी घटक योजनेअंतर्गत २३-२४ मध्ये २९६ कोटी १२ लाख ७ हजार इतका निधी उपलब्ध झाला होता. यापैकी केवळ २२० कोटी ८९ लाख २१ हजार म्हणजे ७४.६० टक्के इतकाच खर्च झाला आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी उपलब्ध २७० कोटी एक हजारपैकी २०५ कोटी ७८ लाख ११ हजार म्हणजे ७६ टक्के इतकाच निधी खर्च झाल्या आहे .जिल्हा नियोजन समितीच्या पालकमंत्री गणेश नाईक यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत देण्यात आलेल्या माहितीतून हे वास्तव समोर आले आहे. यात विशेषत: जिल्हा परिषदेकडून मोठा निधी अखर्चित राहिल्याचे दिसते. जिल्हा परिषदेसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीचा वापर दोन वर्षात करणे अपेक्षित असते. आता दोन महिन्यात हा निधी खर्च होईल असे उत्तर संबंधित यंत्रणाकडून मिळेल.
दरम्यान २०२४- २५ म्हणजे चालू आर्थिक वर्षासाठी (०१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ ) ६८८ कोटी ५० लाख इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून यातील ५७८ कोटी २५ लाख ७३ हजार इतक्या रकमेच्या खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्याला २० टक्के नंतर २० टक्के व अलीकडे गेल्या आठवड्यात २० टक्के मिळून ६० टक्के इतकाच निधी शासनाकडून प्राप्त झाल्याचे समजते. जिल्हा नियोजन समितीच्या ५ फेब्रुवारी रोजीच्या सभेत समोर आलेल्या माहितीनुसार ५७८ कोटी २५ लाख ७३ हजार खर्चाच्या प्रशासकीय मान्यतेपैकी १८२ कोटी ५४ लाख ७६ हजार इतक्याच निधीचे वितरण विविध यंत्रणांना करण्यात आले आहे. यापैकी १२५ कोटी दोन लाख ५८ हजार इतकाच बीडीएसवर खर्च झाला आहे. येत्या दोन महिन्यात यातील बराचसा निधी खर्च होणार असल्याचे सांगितले जाते. याच पाश्र्वभूमीवर पालकमंत्री गणेशा नाईक यांनी लवकरात लवकर निधीचा वापर करून कामे पूर्ण करावीत असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.