पालघर तालुक्यातील माहीम येथील सलोनी कांचन कृष्णदत्त पाटील यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त (राजपत्रित वर्ग एक अधिकारी) म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा ऑक्टोबर २०२५ मधील मुख्य परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.
माहीम येथील भुवनेश कीर्तने विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील साठ्ये महाविद्यालयातून अकरावी–बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे पालघर येथील सेंट जॉन महाविद्यालयातून बी. फार्म पदवी, तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून लोक प्रशासन विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नेट परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.
वर्षपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या वाचनवेल – द पालघर बुक क्लब या उपक्रमाच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल आई कांचन, वडील कृष्णदत्त, नातेवाईक तसेच मित्रपरिवाराने आनंद व्यक्त केला आहे. वाचनवेल टीमनेही त्यांचे अभिनंदन केले आहे.