एक कोटींचा प्रथम पुरस्कार घेत कोकण विभागात नावझे ग्रामपंचायत नंबर एकपालघर मधील चहाडे ग्रा.पंने पटकावला ८० लाखांचा दुसरा क्रमांक!

Date: 2026-11-07
news-banner
नवयुग पालघर....

एक कोटींचा प्रथम पुरस्कार घेत कोकण विभागात नावझे ग्रामपंचायत नंबर एक पालघर मधील चहाडे ग्रा.पंने पटकावला ८० लाखांचा दुसरा क्रमांक!  


मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पालघर जिल्ह्याची दुहेरी बाजी; नाविन्यपूर्ण उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल सुविधांच्या जोरावर नावझे राज्याच्या नकाशावर


पालघर : ग्रामीण विकासाच्या दिशेने नाविन्यपूर्ण उपक्रम, पर्यावरणपूरक विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पालघर जिल्ह्यातील नावझे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत एक कोटी रुपयांचा पुरस्कार घेत कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  तर पालघर जिल्ह्यातीलच चहाडे ग्रामपंचायतीने विभागात द्वितीय क्रमांक मिळवत ८० लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. एकाच जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी कोकण विभागात पहिल्या दोन क्रमांकांवर बाजी मारल्याने पालघरच्या ग्रामीण विकासाच्या कामगिरीवर राज्यस्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ग्रामविकास विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी हे विभागस्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार घोषित केले. या यादीत कोकण विभागातून नावझे ग्रामपंचायतीने प्रथम, चहाडे ग्रामपंचायतीने द्वितीय, तर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वडवळ ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला आहे. वडवळ ग्रामपंचायतीला ६० लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

स्पर्धात्मक मूल्यमापनातून पुरस्कारांची निवड

ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविणे, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणे या उद्देशाने राज्य शासनाने  २०२५-२६ पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले. या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ असा निश्चित करण्यात आला होता.

या अभियानात सहभागी ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी तालुका, जिल्हा, महसुली विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.

 प्रथम तालुकास्तरीय समितीने ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करून प्रत्येक तालुक्यातील दोन सर्वोत्तम ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी निवड केली. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीने प्रत्येक जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींची विभागस्तरीय मूल्यमापनासाठी निवड केली. विभागस्तरीय समितीने प्रत्यक्ष कामगिरीचे मूल्यमापन केल्यानंतर प्रत्येक महसुली विभागातून दोन ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड करण्यात आली. विविध स्तरांवरील मूल्यमापनात मिळालेल्या गुणांकनाच्या आधारे अंतिम पुरस्कार निश्चित करण्यात आले. 

नावझे ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा आदर्श ठसा

नावझे ग्रामपंचायतीने केवळ मूलभूत सुविधांपुरता विकास मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धन, अपारंपरिक ऊर्जा, जलसंधारण, स्वच्छता, डिजिटल सेवा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या कामांमधून गावाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न दिसून येतो.  

पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून गावात गरम पाण्याच्या सुविधेसाठी सोलर हीटर बसविण्यात आले आहेत.

गावातील सुमारे ७० टक्के घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

औषधी वनस्पतींचे उद्यान विकसित करून जैवविविधतेचे संवर्धन आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

तलावाच्या बांधावर विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. यामुळे गावातील हिरवळ वाढविण्यासोबतच सार्वजनिक मालमत्तेच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

नारळ आणि सुपारीच्या झाडांची लागवड करून गावातील रस्त्यांच्या परिसराला हरित स्वरूप देण्यात आले आहे. 

घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी घरांवर क्यूआर कोडचा वापर करण्यात येत आहे. डिजिटल सुविधांमुळे नागरिकांना कर भरणे अधिक सोयीचे झाले आहे.

गावातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करून आवश्यक सुविधा आणि स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. 

शाळा व अंगणवाड्यांमध्ये बोलक्या भिंती, डिजिटल सुविधा आणि शैक्षणिक वातावरण अधिक आकर्षक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.तसेच गावात आकर्षक सेल्फी पॉईंट विकसित करण्यात आला आहे.

सिंचन विहिरी, कुक्कुटपालन शेड आणि जलसंधारणाशी संबंधित विविध कामांच्या माध्यमातून ग्रामस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जलतारा प्रकल्पासारख्या उपक्रमांमधून पाणी व्यवस्थापनालाही प्रोत्साहन देण्यात आले आहे.

नावझे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापराचा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे. गावातील वेगवेगळ्या ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे उभारण्यात आली असून, ग्रामस्थांकडून जमा होणारे प्लास्टिक एकत्रित केले जाते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून प्रेस केलेले प्लास्टिक कारखान्यांमध्ये पाठविले जाते. या प्लास्टिकपासून विविध उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात. त्यापैकी बेंचसारख्या वस्तू ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिल्या जातात. कचऱ्याचे व्यवस्थापन करतानाच त्यातून पुनर्वापराच्या माध्यमातून उपयुक्त साधनांची निर्मिती करण्याचा हा पर्यावरणपूरक उपक्रम आहे.

शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत बायोगॅस सुविधा उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळा आणि अंगणवाड्यांना आवश्यक असलेल्या इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नावझे ग्रामपंचायतीला मिळालेला एक कोटी रुपयांचा प्रथम पुरस्कार आणि चहाडे ग्रामपंचायतीला मिळालेला ८० लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार ही पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी अभिमानाची बाब आहे. 

चहाडे ग्रामपंचायतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षण, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रांतील नियोजनबद्ध कामगिरीमुळे ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले आहे.
चहाडे ग्रामपंचायतीच्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रमुख पैलू
१.गावातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये बोलक्या भिंतींचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करून विद्यार्थ्यांना आधुनिक आणि आनंददायी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
२.गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. 
३.प्रधानमंत्री आवास योजना आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना यांचे अभिसरण (कन्वर्जन्स) करून घरकुलांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 
४. मोठ्या प्रमाणात वनराई बंधाऱ्यांची उभारणी करून पावसाचे पाणी अडविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. 
५.ग्रामपंचायतीच्या कर वसुली प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड आणि ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला.
६.पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षलागवड करून लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले.
७.महिला बचत गटांना बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत स्वयंरोजगार आणि उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून 'लखपती दीदी' बनविण्याच्या उद्दिष्टाला चालना देण्यात आली.
८.पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहिरींसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 
९.पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरण करण्यासाठी शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आला.
१०.गावाच्या विकासात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढवून लोकसहभागातून सार्वजनिक कामे करण्याची संकल्पना राबविण्यात आली. 

केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता शिक्षण, जलसंधारण, स्वच्छता, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल प्रशासन यांचा समन्वय साधण्याचा चहाडे ग्रामपंचायतीचा प्रयत्न या यशातून अधोरेखित झाला आहे.

गावाचा विकास हा केवळ ग्रामपंचायतीचा नव्हे, तर संपूर्ण गावाचा सामूहिक संकल्प असतो, हे चहाडे ग्रामपंचायतीच्या कामगिरीतून अधोरेखित झाले आहे. ग्रामीण विकासासाठी नियोजन, लोकसहभाग आणि प्रभावी अंमलबजावणी यांचा आदर्श चहाडे ग्रामपंचायतीने निर्माण केला आहे.

नावझे ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर सुकऱ्या लाबड, उपसरपंच प्रफुल पाटील, ग्रामपंचायत अधिकारी मानसी लाटे, तर चहाडे ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू जाधव, उपसरपंच पिंटू किसन बसवत. आणि ग्रामपंचायत अधिकारी लता धर्मेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतींनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
या यशस्वी वाटचालीत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अशोक जी. पाटील, तसेच पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक गटविकास अधिकारी बापूराव नाडे,  विस्तार अधिकारी  ग्रामपंचायत - राजू कोळी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत संदीप जाधव आदींचे
मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि प्रेरणा लाभली. जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांनीही वेळोवेळी केलेले मार्गदर्शन या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटना, पालघर तालुका पदाधिकारी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनही या यशाच्या प्रवासात मोलाचे ठरले.

या यशातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी न करता स्थानिक गरजा ओळखून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यास विकासाला नवी दिशा देता येते, हा महत्त्वपूर्ण संदेश मिळतो. पुरस्काराची रक्कम ही भविष्यातील विकासकामांसाठी नवे बळ देणारी ठरणार असून, नावझे आणि चहाडे ग्रामपंचायतींची कामगिरी जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.

navyugpalghar.com

Follow : F | X | Instagram | YouTube

#NavyugPalghar #नावझे #चहाडे #पालघर #मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान #ग्रामविकास #ग्रामपंचायत #कोकणविभाग #ग्रामीणविकास #आदर्शग्रामपंचायत

Leave Your Comments