नवयुग पालघर
***दांडेकर महाविद्यालयाच्या ‘दिवाळी वाचन पर्वणी’अभिनव उपक्रमात पुस्तकांशी मैत्री करण्याची संधी
दिवाळीच्या सुट्टीचा आनंद पुस्तकांच्या सहवासात घेत वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर यांच्या वतीने ‘दिवाळी वाचन पर्वणी!’ हा अभिनव वाचन व पुस्तक परीक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या रा. हि. सावे ग्रंथालय आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या या उपक्रमातून वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच पुस्तकांमधील ज्ञान, विचार, साहित्यसौंदर्य आणि अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या उपक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. सहभागी होणार्या वाचकांनी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतील आपल्या आवडीचे पुस्तक वाचून त्याचे तीन ते चार मिनिटांचे व्हिडिओ स्वरूपात परीक्षण सादर करायचे आहे. त्यामुळे केवळ पुस्तक वाचनापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता वाचलेल्या पुस्तकाविषयी स्वत:चे विचार मांडण्याची संधीही सहभागी वाचकांना मिळणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येकी ५०० रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. सहभागी स्पर्धकांसह विजेत्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ९२२५९९६२८९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या वाचकांना महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून त्यांच्या आवडीची कोणतीही दोन पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पुस्तक परीक्षणाचा तीन ते चार मिनिटांचा व्हिडिओ १० डिसेंबर २०२६ पर्यंते ्ेस्त्ग्ंrarर्ब्rी्ंददव्ेॅुस्aग्त्.म्दस् या ई-मेलवर किंवा ९२२५९९६२८९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवायचा आहे. व्हिडिओसोबत सहभागी व्यक्तीने स्वत:ची आवश्यक माहिती देणेही बंधनकारक आहे.
“पुस्तकांच्या सहवासात सुट्टीचा प्रत्येक दिवस करूया खास!
या संदेशातून वाचनाची चळवळ महाराष्ट्रातील अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्टीत मोबाईल आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन पुस्तकांशी नाते जोडण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होणार असून, विद्यार्थी, पालक आणि वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.