संघर्ष तीव्र करण्याबरोबरीने जन आक्रोश सभेतून एकजुटीचे आवाहन

Date: 2026-11-06
news-banner
नवयुग पालघर
***संघर्ष तीव्र करण्याबरोबरीने जन आक्रोश सभेतून एकजुटीचे आवाहन****

          वाढवण बंदरासह पालघर जिल्ह्यात प्रस्तावित विविध विनाशकारी प्रकल्पांविरोधात पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या अंतर्गत विविध संघटनांच्या प्रमुखांनी जन आक्रोश सभेत तीव्र विरोध व्यक्त केला. 

        यावेळी बोलताना रामकृष्ण तांडेल यांनी वाढवण बंदराचा प्रस्ताव १९९६ पासून पुढे आला असून त्यावेळी युती सरकारच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लोकभावना समजून घेण्यासाठी वाढवण येथे पाठवले होते. त्यांनी लोकभावना बंदरविरोधी असल्याची माहिती दिल्यानंतर हे बंदर रद्द करण्यात आल्याचे सांगितले.सध्याच्या सरकारने हा प्रकल्प पुन्हा जिवंत केला.त्यानंतर अनेक आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगून आजच्या सभेतून सरकारला मोठा दणका दिला आहे.सरकारच्या व्सरकारने जनतेचा हा आवाज ऐकला नाही, तर पेकाटात मारु असा इशारा त्यांनी दिला.

     वाढवण बंदरामुळे मासळीची पैदास होणारा गोल्डन बेल्ट उद्ध्‌वस्त होणार असल्याचा इशारा मानेंद्र आरेकर यांनी दिला. बंदर परिसरात शेकडो बोटी नांगरल्या जाणार असून, मोठ्या जहाजांमधील नांगरणीचे अंतर सुमारे दोन किलोमीटर असेल.त्यामुळे समुद्राचा मोठा भाग जहाजे आणि बोटींनी व्यापला जाईल. परिणामी मच्छीमारांना मासेमारी करणे अशक्य होईल आणि मच्छीमार समाज देशोधडीला लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

     वाढवण बंदरासह प्रस्तावित प्रकल्प पालघर जिल्ह्याला विनाशाच्या खाईत लोटणारे असल्याचे पी. टी. पाटील यांनी सांगितले. वाढवण ते वैतरणा परिसरातील जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे हे कारस्थान सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यटनावर आधारित रिसॉर्टमधून स्थानिकांना रोजगार  मिळत असताना रिलायन्सचा प्रस्तावित प्लांट संपूर्ण समुद्रकिनारा प्रदूषित करून पर्यटन उद्योग संपवेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
         वाढवण बंदर कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, असा ठाम     
 निर्धार संज्योत राऊत यांनी व्यक्त केला. ही सभा केवळ भाषणांची नसून कृतीची सभा आहे. बुलडोझरसमोर उभे राहून काम थांबवूया, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.केंद्र आणि राज्य सरकार  लोकांवर बंदर लादत असल्याचा आरोप करत त्यांनी दोन्ही सरकारांचा निषेध केला. 

       “आम्ही देशद्रोही नाही, तर देशप्रेमी आहोत. मातृभूमीचा विनाश रोखण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत,” असे ब्रायन लोबो यांनी स्पष्ट केले.सरकार  आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.“आम्ही विकासविरोधी नाही. सरकारने रुग्णालये का उभारली नाहीत, प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी का पोहोचत नाही, शाळा का बंद होत आहेत आणि पर्यावरणाचा नाश का केला जात आहे, या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत,” असे ते म्हणाले.

      जनतेने मागणी केलेली नसताना पालघर जिल्ह्यात सातत्याने अहितकारी प्रकल्प लादले जात असल्याचा आरोप मिलिंद राऊत यांनी केला. जिल्हा प्रशासनाकडून बेकायदेशीर कामे केली जात असून, त्याविरोधात आवाज उठवणार्‍या नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवले जात असल्याचे ते म्हणाले.सरकार लोकशाही मार्गाने चालत आहे की ठोकशाहीने, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रचंड वृक्षतोडीमुळे जल, जंगल, जमीन, डोंगर आणि नद्या नष्ट होण्याचा धोका असल्याचे सांगितले. या विनाशकारी प्रकल्पांविरोधात लाखोंच्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

     जन आक्रोश सभा केवळ वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी नसून पालघर जिल्ह्यातील जल, जंगल, जमीन, समुद्र, नद्या, शेती आणि भावी पिढ्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. देशाची नैसर्गिक संपत्ती मोजक्या व्यक्तींच्या खासगी मालकीची करण्याचा प्रयत्न करणारे सरकारच देशहिताच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक मोठ्या प्रकल्पांचे नियोजन या भागात सुरू असल्याचे नमूद करत या प्रकल्पांमुळे स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी आणि मच्छीमारांचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तारापूर एमआयडीसीमधील रासायनिक उद्योगांमुळे नागरिकांना प्रदूषणाचे दुष्परिणाम भोगावे लागत असताना पालघर तालुक्यात आणखी किती प्रकल्प आणणार, असा सवाल त्यांनी केला.

सूर्या आणि वांद्री प्रकल्प आदिवासी उपयोजनेतून उभारण्यात आले असून त्यातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र हे पाणी शेतीऐवजी औद्योगिक क्षेत्र आणि शहरांकडे वळवले जात असल्याने स्थानिक शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

       वाढवणसारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणून विकासाच्या नावाखाली अंबानी-अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या घशात संपूर्ण कोकण घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप प्रकाश लवेकर यांनी केला.

कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नसताना नवीन प्रकल्पांमुळे पुन्हा स्थानिकांना विस्थापित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. चिपळूणजवळील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये परदेशातून प्रदूषणामुळे हाकलून दिलेल्या कारखान्यांना परवानगी देऊन स्थानिक मच्छीमारांचा रोजगार हिरावला जात असल्याची टीका त्यांनी केली.

       “आम्ही भारताचे लोक आहोत. देशाची संपत्ती, जल, जंगल आणि जमीन ही जनतेची आहे. अदानी, अंबानी, मोदी किंवा फडणवीस यांची ती खासगी मालमत्ता नाही,” असे सुनील पर्‍हाड यांनी ठामपणे सांगितले. जनतेने आपल्या मालकीची भावना जागृत करून वाढवण बंदरासह  जिल्ह्यातील कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन न देण्याचा निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी केले. छोट्या-छोट्या आंदोलनांऐवजी पालघर जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्व आंदोलनांना एकत्र आणून व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

       सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून प्रशासन बेकायदेशीर कामे करत असल्याचा आरोप अॅड.स्वप्नील तरे यांनी केला. स्थानिक नागरिकांनी या कामांना जाब विचारल्यास त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे ते म्हणाले.महिला पोलिसांना पुढे करून गावकर्‍यांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा निषेध त्यांनी केला. अशा गुन्ह्यांना आंदोलक घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. वरोर येथील ९० दिवसांपूर्वी सुरू झालेल्या धरणे आंदोलनात हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला असून प्रकल्पांविरोधातील लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

       विनित पाटील यांनी रामाच्या नावाने सत्तेवर आलेले  रामाला वनवासात पाठवले आमची वरोरची भूमी त्याच प्रभू रामचंद्र च्या पवित्र पद पर्शाने पावन झाली आहे.तेच शंखोदर  हा विनाशकारी वाढवण बंदर बुडवणार  आहे.आता डोंगरी ते सागर एक झाले आहे त्यामुळे पालघरचे नैसर्गिक सोंदर्य नष्ट करणार्‍या प्रत्येक प्रकल्पाला जोरदार उत्तर दिले जाईल.

        सभेचे सुत्रसंचालन किंजल निखील पाटील यांनी केले.मधू धोडी,वर्षा वायेडा,मोनिका  भोईर-तरे आदींनी व्यासपीठावरील समन्वायाची भूमिका बजावली.माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचेसह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
navyugpalghar.com
: F | X | Insta | YT
#वाढवणबंदर #वाढवणबंदरविरोधीआंदोलन #जनआक्रोशसभा #वरोर #पालघर #पालघरजिल्हा #जलजंगलजमीन #मच्छीमार #आदिवासीहक्क #पर्यावरणसंरक्षण #स्थानिकांचासंघर्ष #VadhvanPort #SavePalghar #NavyugPalghar

Leave Your Comments