वाढवण बंदर रद्द झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही; आधी आपल्यातील गद्दारांचा बंदोबस्त करा !

Date: 2026-11-06
news-banner
नवयुग पालघर
****वाढवण बंदर रद्द झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही; आधी आपल्यातील गद्दारांचा बंदोबस्त करा ! ****

वाढवण बंदर प्रकल्प रद्द झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार विनोद निकोले यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. वाढवण बंदरविरोधी जनआंदोलनाला राजकीय पक्षांनी अधिक बळ द्यावे आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढावे, असे आवाहन समितीचे प्रमुख नारायण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. या आंदोलनाला माजी आमदार कपिल पाटील, माजी खासदार बळीराम जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे माजी आमदार सुनील भुसारा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किसन नाईक यांनीही पाठिंबा व्यक्त केला. तसेच आंदोलनातील सहभागी संस्था - संघटनांनीसुध्दा हा लढा यापुढे अधिक आक्रमकपणे लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. 

 वाढवण बंदरविरोधी जनआंदोलनाच्या सभेचे प्रास्ताविक नारायण पाटील यांनी केले. या वेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  आपल्या प्रास्ताविकात नारायण पाटील यांनी वाढवण बंदरविरोधी जनआंदोलनाची भूमिका आणि स्थानिक जनतेच्या संघर्षाचे महत्त्व मांडले. वाढवण बंदराचा प्रश्न केवळ एका प्रकल्पापुरता 
मर्यादित नसून तो भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या हक्कांचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या जीवनाचा प्रश्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
        या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या पारंपरिक उपजीविकेवर, मच्छीमारीवर, शेतीवर आणि पर्यावरणावर होणार्‍या परिणामांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी आंदोलनाची व्यापकता स्पष्ट केली. स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून या प्रकल्पाविरोधात संघर्ष करत असून, त्यांच्या लढ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी बळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आधीच इथल्या लोकांना पुरेसे पिण्याचे संचनासाठीचे पाणी उपलब्ध नसताना. चौथी मुंबई व प्रस्तावित प्रकल्पांमुळे वाढणार्‍या लोकसंख्येसाठी आवश्यक पाणी कोठून आणणार असा सवाल त्यांनी केला.

      काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाढवण बंदर प्रकल्पावर तीव्र टीका करत हा महाराष्ट्राच्या मुळावर  उठलेला विनाशकारी प्रकल्प असल्याचे म्हटले. स्थानिक भूमिपुत्र, मच्छीमार, शेतकरी आणि पर्यावरणाच्या हिताला बाधा पोहोचवणार्‍या या प्रकल्पाविरोधात जनतेचा संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

       वाढवण बंदरविरोधी जनआंदोलनाला काँग्रेसचे खंबीर पाठबळ असल्याचे स्पष्ट करत सपकाळ यांनी विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी या लढ्यात एकत्र येण्याचे आवाहन केले. स्थानिक जनतेच्या विरोधाला डावलून प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात जनतेची एकजूट अधिक मजबूत होईल, असा इशाराही त्यांनी दिला. भूमिपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखणे महत्त्‌वाचे असल्याचे सांगत त्यांनी वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.

        विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलनात सहभागी होऊन नंतर प्रकल्पाची कामे घेणार्‍या गद्दारांना जोडे मारायला हवेत तसेच आंदोलनात सहभागी होऊन त्याच प्रकल्पातून आर्थिक लाभ घेणार्‍यांना सर्वप्रथम जाब विचारला पाहिजे, असे सांगत,त्यांचा खरपूस समाचार घेतला.

       अंबानी, अदानी किंवा जिंदाल यांसारख्या बाहेरच्यांची इथे येऊन काही करण्याची हिम्मत नाही असे निदर्शनास आणून देत, आपल्यातील कोण लोक प्रकल्पाची कामे घेत आहेत, यावर आंदोलनकर्त्यांनी  लक्ष ठेवण्याचे आवाहन दानवे  यांनी केले.अमित चुरी यांचा तिखट धब्दात समाचार घेताना दानवे यांनी,अशा मध्यस्थांमुळे आंदोलन कमकुवत होते,हे लक्षात घेऊन अशा बगलबच्च्यांचा समाचार घेऊन नंतर सरकारकडे जाऊ असे दानवे यांनी सुचविले.सर्व उपस्थितांनी दानवे यांच्या या भूमिकेचे प्रचंड टाळ्यांनी स्वागत केले. 

      उद्योगसमूहांना स्थानिक भूमीवर प्रकल्प उभारण्याची संधी दिली जात असताना स्थानिकांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकल्पातून फायदा मिळवणार्‍यांच्या हितापेक्षा स्थानिक नागरिकांचे हक्क, उपजीविका आणि पर्यावरण यांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 वाढवण बंदरासाठी ७६ हजार कोटींची तरतूद असताना नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना केवळ ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली जाते आणि तेही ३० टक्के नुकसान झालेल्यांनाच, तर शक्तीपीठ महामार्गाला ८५ हजार कोटी दिले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
 हा समुद्र, ही शेतजमीन आणि मच्छीमारांचे जाळे आपले आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवावी लागेल, असे आक्रमक आवाहन त्यांनी केले. पोलिसांना घाबरण्याची गरज नाही, पोलिसांनी सरकारची दलाली न करता जनतेची नोकरी करावी, ते जनतेच्या पैशावर पगार घेतात हे लक्षात ठेवावे, असेही ते म्हणाले.

 या आंदोलनात ५६ संघटना सहभागी असून आता रोज निवेदने देण्यापेक्षा मुख्यालयाला घेराव घालून आंदोलन अधिक आक्रमक करण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. वाढवण बंदर आणि विमानतळ अदानी समूहाच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप करत, या ठिकाणांचा वापर तस्करीसाठी होत असल्याचा आणि सोने तस्करीत भाजप कार्यकर्ते सापडल्याचा आरोपही त्यांनी केला.  या संघर्षात आम्ही खांद्याला खांदा लावून नाही, तर एक पाऊल पुढे राहून लढण्यास तयार आहोत, पण हा लढा आता आक्रमक पद्धतीने पुढे न्यायला हवा,असे त्यांनी सुचविले.

        आमदार विनोद निकोले यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सध्या सत्तेत असलेल्या भाजपला देश त्यांच्या मालकीचा असल्याची मग्रुरी निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. आगामी जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपमुक्त पालघर जिल्हा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निकोले यांनी दिला. वाढवण बंदरासारख्या प्रकल्पांमुळे स्थानिक जनतेच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी जनतेने एकत्र येऊन सत्ताधार्‍यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला राजकीय पाठबळ देत भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

 वाढवण बंदर केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे सरकार सांगते, परंतु हे बंदर रद्द केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आमची नाळ या जमिनीशी जुळलेली आहे. जिल्हा वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असेही निकोले यांनी यावेळी सांगितले.

 तुमचा विकास आम्ही पाहिला आहे. बुलेट ट्रेनसाठी जमिनी घेतल्या परंतु मोबदला दिला नाही. थर्मल पॉवरमध्ये नोकर्‍या दिल्या असा खोटा प्रचार करत आहेत. खोटी आणि फसवी आश्वासने देऊ नका. आमचा विकास करायचा असेल तर आमच्या शेतीला, मच्छीमारीला प्राधान्य द्या,अशी मागणी निकोले यांनी यावेळी केली.

 ५० लोकांनी सुरू केलेले हे आंदोलन आज २० हजार लोकांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून, पुढील आंदोलनाची हाक दिल्यास हा आकडा दोन ते तीन लाखांपर्यंत जाईल, असा विश्वासही यावेळी आमदार निकोले यांनी यावेळी व्यक्त केला.निकोले यांनीही स्थानिकांशी गद्दारी करत रस्त्याच्या कामासाठी मदत करणार्‍या अमित चुरी यांच्यावर जोरदार हलॢाबोल केला.

        माजी आमदार कपिल पाटील यांनी वरोरवासीयांच्या दीर्घकालीन संघर्षाचा उल्लेख करत या लढ्याला सर्वच राजकीय पक्षांनी अधिक बळ देण्याचे आवाहन केले.हा लढा गेल्या अनेक वर्ष सुरु असून या लढ्याचे नेतृत्व करणारे नारायण पाटलांसह त्यांच्यासोबतच्या असंख्य कार्यकर्त्यांनी कोणतीही  तडजोड केली नसल्याबद्दल त्यांनी कौतुक केले आमदार विनोद निकोले,कष्टकरी संघटना,भूमीसाना,आदिवासी एकता परिषद  अशा अनेकांनी या लढ्याला आजवर साथ दिली असे सांगून इथला मच्छिमान इथला शेतकरी आदिवासी सर्जन या प्रकल्पामुळे उद्ध्‌वस्त होणार असल्याने आता या संघर्षाला टोक यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 माजी खासदार बळीराम जाधव यांनी वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत भूमिपुत्र आपल्या हक्कांसाठी अखेरपर्यंत लढतील आणि आपणही त्यांच्या सोबत अखेरपर्यंत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोणताही प्रकल्प लादण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

          राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे माजी आमदार सुनिल भुसारा यांनी पालघर जिल्ह्याच्या भवितव्याशी खेळणार्‍या वाढवण बंदराविरोधात  स्थानिक नागरिकांच्या संघर्षाला पाठिंबा दर्शविला. वाढवण बंदर हा केवळ एक प्रकल्प नसून पालघर जिल्ह्यातील निसर्ग, पर्यावरण, शेती, मासेमारी आणि स्थानिक जनजीवनावर दूरगामी परिणाम करणारा विषय आहे. या प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता, मासळीचे नैसर्गिक अधिवास आणि मच्छीमार बांधवांच्या पारंपरिक व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. तसेच शेतजमिनी, पाण्याचे स्रोत, पर्यावरणीय समतोल आणि शेतकर्‍यांच्या उपजीविकेवरही संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले,सरकारने विकासाचे प्रकल्प राबवताना स्थानिक जनतेचा विश्वास, संमती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांना प्राधान्य देणे आवश्यकता असल्याचे ते म्षणाले,

        महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किसन नाईक यांनी वाढवण बंदरविरोधी आंदोलनाबाबत मनसेची भूमिका स्पष्ट करताना, मनसेप्रमुख राज ठाकरे आदेश देतील, त्याप्रमाणे मनसे या लढ्यात सहभागी होईल, असे सांगितले.

        मराठी अभ्यास केंद्राचे डॅा. दीपक  पवार यांनी बोलताना, पालघरपासून पोलिसांनी आमच स्वागत केलं.पोलिसांच्या हातामध्ये काठ्यांचा भारा होता. गावामध्ये शेतकर्‍याच्या हातामध्ये वैरणीचा भारा होता महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांच्या पोरांच्या हातामध्ये काठ्यांचा भारा दिलेला आहे.याला ते सध्या लोकशाही असं म्हणतात हे फडणवीसच,मोदीच सरकार आहे आणि हे  जे सरकार आहे या सरकारची बाजू घेणं याला जर  देशप्रेम म्हणत असतील तर देशद्रोही होणं जास्त फायद्याच असल्याचे सांगितले. त्यामुळे राहुल गांधी ज्या पद्धतीने काम करतात तसा देशद्रोह करायला मला आवडेल, संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात तसा देशद्रोह करायला मला आवडेल आणि कॉम्रेड निकोले ज्या प्रकारच संघटन करतात तसा देशद्रोह मला करायला आवडेल. भामट्यांच्या देशप्रेमापेक्षा संघर्ष करणार्‍या लोकांचा देशद्रोह ही चांगली गोष्ट आहे आणि पालघर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या पाशवी बहुमताच्या सरकारच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

navyugpalghar.com
#वाढवणबंदर #जनआक्रोशसभा #वरोर #पालघर #भूमिपुत्र #विनाशकारीप्रकल्प #जनसंघर्ष #NavyugPalghar
Follow : F | X | Instagram | YouTube

Leave Your Comments