https://youtu.be/O1mC9NaaUvk?si=-g_vbGw1oYqojLJs
🚧 मुंबई–अहमदाबाद व घोडबंदर–ठाणे मार्गावरील खड्डे व कोंडी कायम; खुद्द परिवहन मंत्र्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून मुंबई–अहमदाबाद महामार्गावर तर गेल्या काही महिन्यांपासून घोडबंदर–ठाणे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे, निकृष्ट दर्जाची कामे आणि वाढती वाहतूक कोंडी ही नागरिकांच्या संतापाची ठळक कारणे बनली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री यांनी याबाबत संबंधित यंत्रणांना वारंवार सूचना दिल्या असतानाही, प्रत्यक्ष परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल झालेला दिसत नाही. उलट, या मार्गांवरील प्रवास दररोज अधिकाधिक वेळखाऊ व धोकादायक ठरत आहे.
घोडबंदर–ठाणे मार्गाची अवस्था तर अक्षरशः दयनीय बनली आहे. रस्त्यावरील असंख्य खड्डे व अपुरी देखभाल यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा फटका अखेर खुद्द राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही बसला.
मंगळवारी (१ ऑक्टोबर) दुपारी सुमारे २.३० वाजता परिवहन मंत्री आपल्या ताफ्यासह मार्गक्रमण करत असताना गायमुख परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीत अडकले. काही वेळासाठी त्यांच्या ताफ्यालाच ठप्प परिस्थितीचा सामना करावा लागला. हा संपूर्ण प्रसंग नागरिकांनी मोबाईलवर टिपून सोशल मीडियावर व्हायरल केला असून, त्यावरून आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.
खुद्द परिवहन मंत्र्यांनाच जेव्हा वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष फटका बसला, तेव्हा नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे — “मग आमच्यासाठी सुधारणा कधी होणार?”