नवयुग पालघर
**डॉ. ज्योती ठाकरे यांची कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागार समितीवर निवड**
कोकण मराठी साहित्य परिषद या राज्यातील अग्रगण्य व प्रतिष्ठित साहित्य संस्थेच्या सल्लागार समितीवर शिवसेनेच्या उपनेत्या तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. ज्योती ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या त्रिसदस्यीय सल्लागार समितीत महाडच्या शोभाताई सावंत आणि पनवेलचे रामशेठ ठाकूर यांचाही समावेश आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेतील एक गुणी कार्यकर्ती म्हणून कार्य करत सल्लागार समिती सदस्यपदापर्यंत मजल मारणाऱ्या डॉ. ठाकरे यांना यापूर्वी ‘उत्कृष्ट ग्रामीण लेखिका’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी तीन पुस्तकांचे संपादन केले असून त्यांचा “मध्यावर” हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.
तसेच, त्यांनी तीन राज्यस्तरीय साहित्य संमेलनांमध्ये स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर येथे पार पडलेले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन विशेष गाजले होते.
उत्तम वक्त्या, व्याख्याता, सुसंवादिका आणि संवेदनशील कवयित्री म्हणून ओळख असलेल्या डॉ. ज्योती ठाकरे या समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य, संस्कृती आणि कला-क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या सल्लागार समितीवरील निवडीमुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.