नवयुग पालघर
**जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्वयंसेवी संस्था व कर्मचार्यांचा गौरव**
सायवन आणि गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे राज्यात सर्वोत्कृष्ट ठरले आहेत. सर्व प्रसुती सुरक्षित होत असून, त्याचे ९९.९% हे प्रमाण खूपच कौतुकास्पद आहे. हे सर्वच ठिकाणी व्हायला हवे यासाठी प्रयत्न करायला हवा. असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.
जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागामार्फत ‘जागतिक आरोग्य दिन २०२६’ निमित्त जननायक बिरसा मुंडा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाची ““Together for Health, Stand with Science” ही थीम लक्षात घेऊन आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणार्या स्वयंसेवी संस्था, वित्तीय व औद्योगिक संस्था तसेच व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्र, तारापूर , स्टेट बँक ऑफ इंडिया, आय सी एम आर, एल अँड टी लिमी., सावली ट्रस्ट, किशोर मुसळे ट्रस्ट, समता फाउंडेशन, लुपिन फाउंडेशन पुणे/ लुपिन फाउंडेशन तारापुर, एफएमआर फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, ओएनजीसी, मुंबई, नवनित फाउंडेशन, वेदांता वैदयकिय महाविदयालय, केशव सृष्टी, ग्रामिण फर्स्ट, गोवर्धन ईको व्हिलेज, निऑन फाउंडेशन पालघर, निरामया फाउंडेशन पालघर, सीएसआर अंधेरी /वसई आदी संस्थांसह वैदयकिय अधीक्षक ग्रा.रु. मोखाडा, ग्रा.रु. तलासरी, जि.आरोग्य अ.कार्यालय पालघर, जि.आ.अ.कार्यालय पालघर, जि.आ.अ.कार्यालय पालघर आदींचा समावेश आहे.
यावेळी पुढे बोलताना रानडे यांनी, कुटुंब कल्याणमध्ये जिल्ह्यात चांगलं काम सुरू आहे. हे काम आणखी चांगले प्रकारे वाढविल्यास २० ते २५ वयातील मुलींची होणारी तिसरी चौथी आणि पाचवी प्रसूतीची खेप थांबवता येईल. यासाठी पत्रकारांसह सर्व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य गरजेचे आहे असे ते म्हणाले.
राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकामध्ये चांगलं काम सुरु असून, ८ प्रा. आ.केंद्र आणि २८ उपकेंद्रांनी यात दर्जा प्राप्त केला असून स्मार्ट पीएचसीसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करून घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. याकामासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व टीमचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याने, पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही अडचण येत नसल्याचे सांगून औषध घेण्यासाठी जिल्हा नियोजन व अन्य सर्व माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची तसेच सेस मधूनही भरीव तरतूद या गोष्टीसाठी करीत असल्याची माहिती रानडे यांनी दिली.
मासवण येथील एका घटनेत आशा व अंगणवाडी सेविका यांनी गरोदर मातेची अतिशय योग्य काळजी घेतली, प्रसूतीसाठी प्रा.आ.केंद्रात व पुढे ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले, योग्य प्रसूतीही झाली. मात्र नंतर अॅम्बुलन्स चालकाने बाळ बाळंतीण यांना घरपोच न सोडल्याने जी चुकीची घटना घडली त्यामुळे आठ महिने केलेले चांगले काम फुकट गेले. या प्रकरणात बेफिकीर व बेदरकार यंत्रणा असे आपले चित्र उभे करण्यात आले, त्यामुळे आपण आता मूलभूत बाबींवर अधिक भर देत आहोत. चांगल्या मुलभूत सुविधा उभ्या करण्याबरोबर नियोजनही योग्य करण्याची गरज रानडे यांनी अधोरेखित केली. मासवणच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेवटपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मॉनिटरिंग सेंटर सुरू आहे. या प्रक्रियेत गरोदर मातेची नोंदणी झाल्यापासून प्रसूती होऊन घरी जाईपर्यंत आणि पुढे मूल तीन वर्षाचे झाल्यावर अंगणवाडी, सहाव्या वर्षी शाळेत जाईपर्यंत व पुढे शिक्षण विभाग याची काळजी घेते. या सर्व प्रक्रियेमध्ये कुठेही चूक झाली तरी दोष आपल्यावर येणार आहे, म्हणून अशी चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आपल्या हातात असल्याचेही रानडे यांनी आग्रहाने सांगितले.
या सर्वांमागे अॅनिमिया हे मुख्य कारण आहे. यावर उपाय म्हणून आपण बारा बाय बारा उपक्रम सुरू केला आहे. १२ व्या वर्षी मुलीचे १२ एचपीवी लसीकरण करणं हे आपलं उद्दिष्ट आहे.
एचपीव्ही लसीकरणासाठी शासनाकडून मोफत लस उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे आपण शासनाने ठरविलेल्या वयोगटासाठीच लसीकरण पूर्ण करणार असल्याचे रानडे यांनी स्पष्ट केले.
शासकीय यंत्रणा जिथे कमी पडते तेथे अनेक बँका आणि स्वयंसेवी संस्था हवे तेव्हा सहकार्य करत असल्याचे सांगत त्यांनी, लुपिनने दिलेल्या तीन व्हॅन एक प्रकारे फिरत्या दवाखान्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, एल अँड टी यासारख्या अन्य अनेक संस्थांची वेळोवेळी मदत मिळत असल्याचे सांगताना त्यांनी एचडीएफसी बँकेने केलेल्या मदतीचे उदाहरण दिले. विरार परिसरात एचडीएफसी बँकेने एक जिल्हा परिषद शाळा बांधून दिली होती. त्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी दीड कोटींची तरतूद केली होती, त्यांचं हे काम चांगलं होतच, परंतु आम्हाला क्षयरोग तपासणीसाठी अद्यावत एक्स-रे मशीन हवी होती, म्हणून आम्ही त्यांच्याकडे आग्रही मागणी केल्यावर त्यांनी एक - दीड महिन्यातच एक कोटी रकमेच्या चार मशीन उपलब्ध करून दिल्याची आठवण सागून त्यांचे आभार मानले.तसेच एका संस्थेकडे १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यासाठी ५० शिक्षकांच्या पगारासाठी आग्रह धरला होता, तोही त्यांनी पुरवल्याबद्दल रानडे यांनी त्यांचे आभार मानले. जेथे गरज आहे तेथे वेगाने आपण पोहोचणे गरजेचे असते. वेळेत काम झाल्यास त्याचा परिणाम आणि उपयोगही चांगला होतो असे सांगून आरोग्य विभागानेही आत्मपरीक्षण करणे गरजेचे असून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. संतोष चौधरी यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत जिल्हा आरोग्य विभागाच्या कामाचा विस्तृत आढावा घेताना, २४४१८ पैकी २४३९५ म्हणजेच ९९ टक्के संस्थात्मक प्रसूती तर ९९ टक्के गरोदर माता नोंदणी केल्याचे सांगितले. सायवन प्राथमिक आरोग्य केंद्र एकूण प्रसूतीमध्ये राज्यात प्रथम असल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रा.पं.म्हणून पात्र ठरल्याचेही ते म्हणाले.
यावेळी एकूण २५ स्वयंसेवी संस्था, वित्तीय व औद्योगिक संस्था तसेच व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. गौरवप्राप्त प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करताना, आरोग्य क्षेत्रात पुढेही सक्रिय सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच आरोग्य विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या कर्मचार्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अजय ठाकरे यांनी आभार मानले.