कुर्झे धरणातून पाण्याचा विसर्ग — तलासरीत ८५ घरात पाणी घुसून मोठे नुकसान

Date: 2025-10-02
news-banner
https://youtu.be/_IDaO59PIVE?si=6k7Vj4_y08_bgu_2

📰 कुर्झे धरणातून पाण्याचा विसर्ग — तलासरीत ८५ घरात पाणी घुसून मोठे नुकसान

तलासरी :
तलासरी तालुक्यातील कुर्झे धरण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रविवारी रात्री धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे वेरोली नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि नदीलगतच्या वडवली, सवणे आणि वंकास या गावांतील जवळपास ८५ घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. पाण्याचा विसर्ग कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शनिवार व रविवारपासून तलासरी तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर सुरू होता. या दोन दिवसांत तालुक्यात एकूण १७५ मिमी पर्जन्यवृष्टी नोंदवण्यात आली. मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते, तसेच शेती पाण्याखाली गेली होती. या अतिवृष्टीमुळे कुर्झे धरण १०० टक्के भरले. सुरुवातीला १० सें.मी. पाण्याचा विसर्ग सुरू होता; मात्र दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणातील साठा झपाट्याने वाढला.

कुर्झे धरण मातीचे असल्याने त्यात अतिरिक्त पाणी साठवणे शक्य नसल्याने रात्री धरणाचे दरवाजे ५० सें.मी.ने उघडण्यात आले. त्यामुळे वेरोली नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली आणि नदीकिनारी वसलेल्या गावांमध्ये पाणी घुसले. वडवली, सवणे आणि वंकास या गावांतील जवळपास १०० घरांमध्ये दीड फूट पाणी शिरल्याचे नोंदवले गेले.

गावनिहाय तपशील असा —

वडवली नवापाडा : २७ घरे

ओझरपाडा : २६ घरे

हडळपाडा : १३ घरे

सवणे पाटीलपाडा : १२ घरे

वडवली सोनारपाडा : ७ घरे

वंकास : ८ घरे


या घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य, घरगुती वस्तू, फर्निचर इत्यादींचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती वडवली गावाचे सरपंच प्रमोद ओझरे तसेच पोलिसांनी दिली.

गावात पाणी शिरल्याची माहिती मिळताच महसूल विभाग व पोलिस पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अमोल पाठक यांनी दिले आहेत. महसूल कर्मचारी व तलाठी यांच्याकडून घराघरांत जाऊन नुकसानाची नोंद केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी वडवली गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तातडीने अन्नधान्याच्या किट्सचे वाटप करण्यासह ताडपत्री पुरविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

कुर्झे धरणाची क्षमता ३५ दशलक्ष घनमीटर असून धरणाची उंची ७०.४० फूट आहे. हे मातीचे धरण असून त्याला तीन दरवाजे आहेत. १९७० साली दापचरी दुग्ध प्रकल्पासाठी हे धरण बांधण्यात आले असून सध्या ते जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.

या परिस्थितीबाबत जलसंपदा विभागाचे प्रवीण भुसारे यांनी सांगितले की, “धरण परिसरात अतिवृष्टी झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. मातीचे धरण असल्याने धोका टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग ५९ सें.मी.पर्यंत करण्यात आला.”

तहसीलदार अमोल पाठक म्हणाले, “महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त घरांची तपशीलवार माहिती घेतली जात आहे. पंचनामे करून पुढील भरपाईची प्रक्रिया हाती घेतली जाईल.”

सरपंच प्रमोद ओझरे यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी ग्रामस्थांना वेळेवर माहिती देणे गरजेचे होते. सूचना न दिल्याने नुकसान टाळता आले नाही.”

धरण व्यवस्थापनातील या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.

Leave Your Comments