२८ सप्टेंबर २०२५ | सायं. ५.०० वा.
🌧️ पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने वाहतूक व्यवस्था विस्कळीत
पालघर जिल्ह्यात शनिवारपासून सुरू झालेल्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, ओढे आणि पुलांवरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे विक्रमगड, वाडा व वाणगाव पोलिस ठाणे हद्दीत वाहतूक बंद करण्यात आली असून काही ठिकाणी नैसर्गिक अडथळे निर्माण झाले आहेत. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत.
🛑 विक्रमगड पोलिस ठाणे हद्द
देहर्जे नदीवरील शीळ गावाकडील पूल पाण्याखाली गेला असून देहर्जे ते शीळ गाव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
शेलपाडा–मालवाडा रस्ता येथे मोरीवरून सुमारे ३ फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
🛑 वाडा पोलिस ठाणे हद्द
मुसळधार पावसामुळे वाडा परिसरात अनेक पुलांवरून पाणी वाहत असून वाहतूक बंद करण्यात आली आहे —
1. वाडा–कळंबे पूल : पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद.
2. देवघर–बिलोशी मार्ग : रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद.
3. गोऱ्हे–भोईरपाडा पूल : पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद.
4. जाले–बोरशेती पूल : पाणी वाढल्याने वाहतूक बंद.
या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🛑 वाणगाव पोलिस ठाणे हद्द
कलौली देदाळे परिसरात चिंचेचे झाड कोसळल्याने चिंचणी–वाणगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. संबंधित झाड हटविण्याचे काम तातडीने सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
🛑 मनोर पोलिस ठाणे हद्द
मनोर पालघर रस्त्यावर मनोर गाव संपल्यानंतर पालघरच्या दिशेला रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
ℹ️ इतर पोलीस ठाण्यांत स्थिती सामान्य
पालघर जिल्ह्यातील इतर पोलिस ठाणे हद्दीत आत्तापर्यंत कोणतीही मोठी नैसर्गिक आपत्तीची नोंद झालेली नाही.
ℹ️ धरण परिसरातील पाऊस :
रविवार सकाळी ६.०० वा.पासून संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत पाऊस.
तानसा धरण परिसरात १६२ मिमी.
मोडकसागर धरण परिसरात २२६ मिमी तर मध्य वैतरणा धरण परिसरात १८२ मिमी. इतका पाऊस झाला आहे.
🚨 प्रशासनाचा इशारा
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नद्या व ओढ्याजवळ जाणे टाळावे, तसेच बंद रस्त्यांवरून प्रवास करू नये असा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलिस ठाणे किंवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ℹ️ २९ सप्टेंबर रोजी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर
दरम्यान, पालघर जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तर सोमवार २९ सप्टेंबर रोजी देखील सतर्कतेचा इशारा जाहीर केल्याने अतिवृष्टीची शक्यता घेऊन पालघरच्या जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांनी सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या तसेच खाजगी संस्थांच्या आणि शासकीय आश्रमशाळा सहित सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली असून शिक्षक व प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी मात्र आपापल्या ठिकाणी कार्यरत राहावे असे निर्देश दिले आहेत.