जव्हारमध्ये आदिवासींचा विराट मोर्चा; बंजारा समाजाच्या घुसखोरीला तीव्र विरोध

Date: 2025-10-01
news-banner
https://youtu.be/NSTnTDdtdho?si=QULuWGdyiVB7WZ0-

जव्हारमध्ये आदिवासींचा विराट मोर्चा; बंजारा समाजाच्या घुसखोरीला तीव्र विरोध

मोखाडा : धनगर आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाने आदिवासी प्रवर्गात समावेश करून हैद्राबाद गॅजेटच्या आधारे आरक्षण लागू करण्याची चळवळ जोर धरली आहे. राज्यातील विविध भागांतून काढण्यात येणाऱ्या मोर्चांमुळे आदिवासी समाजात तीव्र नाराजी व संतापाची लाट उसळली आहे. या घुसखोरीला आळा घालण्यासाठी व आदिवासी आरक्षण टिकवण्यासाठी जव्हार येथे युवा आदिवासी सेवा संघाच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

तारपा चौकातून निघालेल्या रॅलीने क्रांती चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मार्गक्रमणादरम्यान “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बाप्पाचे” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोर्चात आदिवासी समाजातील मोठ्या संख्येने बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.

क्रांती चौकातील सभेत मार्गदर्शन करताना वक्त्यांनी स्पष्ट केले की, “आदिवासींना मिळालेले आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक तरतुदींमुळे आहे. कोणत्याही गॅजेटला आम्ही मान्यता देत नाही. आरक्षण हवे असल्यास आदिवासी समाजात जन्म घ्यावा लागतो. त्यासाठी आम्ही मोठे आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही. घुसखोरी कदापि सहन केली जाणार नाही.”

या प्रसंगी आमदार हरिचंद्र भोये, माजी आमदार सुनिल भुसारा, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश निकम,जि.प. माजी अध्यक्षा सुरेखा थेतले, माजी उपसभापती प्रदीप वाघ, सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडो, अशोक शिंगाडा आदी मान्यवर उपस्थित होते.

मोर्चादरम्यान बंजारा समाजाकडून आरक्षणात होणाऱ्या घुसखोरीला विरोध ही प्रमुख मागणी करण्यात आली. त्यासोबतच —

आदिवासी विभागाचा निधी इतर विभागांकडे वळवू नये,

आश्रमशाळांतील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत,

बोगस आदिवासींना दिलेल्या सेवा संरक्षण मागे घेऊन सेवेतून बडतर्फ करावे,

खरी आदिवासी भरती करावी,

१७ प्रवर्गातील पेसा भरतीद्वारे कायमस्वरूपी नियुक्त्या कराव्यात,

आश्रमशाळांमधील बाह्य एजन्सीमार्फत होणारी भरती प्रक्रिया तात्काळ थांबवावी,

सेंट्रल किचनमधून पुरवले जाणारे निकृष्ट दर्जाचे जेवण बंद करावे,


अशा मागण्या जोरदारपणे मांडण्यात आल्या.

मोर्चाला आदिवासी समाजाकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने युवा आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष संदीप माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या विराट मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी समाजाने आपला स्पष्ट व ठाम इशारा सरकारला दिला आहे.

Leave Your Comments