जि.प. व पं.स. निवडणुका : 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत
14 ते 17 ऑक्टोबरदरम्यान हरकती नोंदवता येणार; 3 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर
मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) : राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्याची सोडत 13 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर रोजी स्थानिक वृत्तपत्रांमधून आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर नागरिकांना 14 ते 17 ऑक्टोबरदरम्यान हरकती व सूचना दाखल करता येतील.
प्राप्त हरकतींचा विचार करून अंतिम आरक्षण 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात प्रकाशित केले जाईल. या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.