जव्हारच्या हिरडपाडा आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू; तीन जण जखमी, मुख्याध्यापकांसह तिघे निलंबित

Date: 2026-10-21
news-banner
नवयुग पालघर
****जव्हारच्या हिरडपाडा आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू; तीन जण जखमी, मुख्याध्यापकांसह तिघे निलंबित****
**गरबा पाहून परतताना कगोडीजवळील नदी घाटात दुचाकीचा अपघात; पाच विद्यार्थी एकाच दुचाकीवर असल्याची माहिती**

 जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला असून, अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले . या घटनेनंतर आश्रमशाळेच्या कारभाराची चौकशी करण्यात आली असून, कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून माध्यमिक मुख्याध्यापक, अधीक्षक आणि चौकीदार अशा तिघांना संबंधित संस्थेने निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेतील इयत्ता नववीतील दोन, दहावीतील एक आणि बारावीतील दोन असे पाच विद्यार्थी १९ ऑक्टोबर रोजी रात्री आश्रमशाळा प्रशासनाच्या नकळत सारसून येथे गरबा पाहण्यासाठी गेले होते, असे समजते. आश्रमशाळेपासून सारसून हे गाव सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे. गरबा पाहून पहाटेच्या सुमारास परतत असताना पाचही विद्यार्थी एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते, असे सांगितले जाते.

पहाटे सुमारे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान कगोडीजवळील नदी घाटातील उतारावर दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य चार जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

उर्वरित तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले असून, सध्या तिन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर व चांगली असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

आश्रमशाळा प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी
घटनेची माहिती मिळताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारचे प्रकल्प अधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार (भा.प्र.से.) यांनी हिरडपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. विद्यार्थ्यांच्या बाहेर जाण्याच्या घटनेत तसेच संबंधित जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानुसार संबंधित संस्थेने आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक, अधीक्षक आणि चौकीदार या तिघांना निलंबित केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या नकळत बाहेर जाण्याची घटना नेमकी कशी घडली, तसेच त्यासंदर्भात कोणाची कोणती जबाबदारी होती, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवणे, रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था राखणे आणि विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची तातडीने दखल घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, ते पूर्णपणे बरे होईपर्यंत प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

#Palghar #Jawhar #आश्रमशाळा #अपघात #आदिवासीविद्यार्थी #NavyugPalghar
Follow: F | X | Insta | YT — navyugpalghar.com

Leave Your Comments