वाडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्याची काँग्रेसची मागणी

Date: 2026-10-15
news-banner
नवयुग पालघर

***वाडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्याची काँग्रेसची मागणी***

वाडा, दि. ९ ऑक्टोबर २०२६ : पालघर व ठाणे जिल्ह्यांसह वाडा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, दुष्काळी सवलती आणि कर्जमाफी द्यावी, तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याबाबत संविधानिक व कायदेशीर प्रक्रियेनुसार कार्यवाही करावी, अशा दोन प्रमुख मागण्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वाडा तहसीलदारांची भेट घेऊन मुख्यमंत्री व राष्ट्रपती यांच्या नावे स्वतंत्र निवेदने सादर केली.

माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील व इतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ही निवेदने तहसीलदारांकडे दिली. यावेळी काँग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष स्वप्निल अशोक ठाकरे उपस्थित होते.

वाडा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी
राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त जिल्हे व तालुक्यांच्या यादीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसह वाडा तालुक्याचा समावेश नसल्याबद्दल काँग्रेसने निवेदनातून नाराजी व्यक्त केली आहे. वाडा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील शेतकरी शेतीवर अवलंबून असून, यंदा पावसाचे प्रमाण आणि सातत्य यामध्ये अनियमितता राहिल्याने शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भात, नागली, वरई, उडीद, तूर, चवळी यांसह विविध पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर शेतीकामांसाठी खर्च केला असताना अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. विशेषतः अल्पभूधारक आणि लघुभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील शेतीपिकांचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानीचे पंचनामे करावेत, प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा आणि पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई व दुष्काळी मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार दुष्काळी सवलती, कर्जाबाबतच्या सवलती आणि इतर योजनांचा लाभ द्यावा. तसेच पाणी व चाऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवून संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठीही निवेदन
दुसऱ्या निवेदनातून लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासह निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता व विश्वासार्हता कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर स्पष्ट माहिती देऊन जनतेच्या शंकांचे निरसन करावे, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याबाबत केंद्र शासनाने संविधानिक व कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढवावे, निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना योग्य माहिती देऊन उत्तरे द्यावीत आणि जनतेचा निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात, असेही म्हटले आहे.

निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरील पोलिस कारवाईबाबतही निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे.

या निवेदनाची दखल घेऊन ते जिल्हाधिकारी, पालघर यांच्यासह महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना शासकीय मदत मिळवून देणे आणि निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत उपस्थित प्रश्नांवर स्पष्टता आणणे, या दोन मुद्द्यांवर काँग्रेसने वाडा तहसीलदारांमार्फत शासनाचे लक्ष वेधले आहे.

Leave Your Comments