नवयुग पालघर
****पालघर जिल्ह्यात वाचन संस्कृतीला बळ; १,९१४ वाचन कोपरे, १४५ केंद्रस्तरीय वाचनालये स्थापन****
**आठही तालुक्यांत प्रत्येकी एक आदर्श वाचनालय; ४५ मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये नियमित वाचनाची सवय रुजविण्यावर भर**
पालघर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांची पायाभूत साक्षरता, भाषिक कौशल्ये आणि आकलन क्षमता विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद पालघरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने रूम टू रीड इंडिया ट्रस्टच्या सहकार्याने वाचन उपक्रमाला गती दिली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे आठ आदर्श वाचनालये, केंद्रशाळा स्तरावर १४५ केंद्रस्तरीय वाचनालये आणि शाळांमध्ये १,९१४ वाचन कोपरे यस्थापन करण्यात आले असून या वाचनालयांचा प्रभावी वापर नियमित वाचनाची सवय रुजविण्यासाठी ४५ मास्टर ट्रेनर्सना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
या अनुषंगाने निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियानाला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने ५ व ६ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद पालघर आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील ४५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. वाचनालयांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन, विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता आणि वाचनाच्या माध्यमातून अध्ययन प्रक्रिया अधिक आनंददायी करण्यावर या प्रशिक्षणात भर देण्यात आल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली.
आठ तालुक्यांत आठ आदर्श वाचनालये
जिल्ह्यात वाचन उपक्रमाची रचना तीन स्तरांवर करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे आठ आदर्श वाचनालये, केंद्रशाळा स्तरावर १४५ केंद्रस्तरीय वाचनालये आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गातच पुस्तके वाचण्याची संधी मिळावी यासाठी १,९१४ वाचन कोपरे स्थापन करण्यात आले आहेत, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपलीकडील बालसाहित्य, गोष्टींची पुस्तके आणि वयोगटाला अनुरूप वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून वाचनालये केवळ पुस्तके ठेवण्याची जागा न राहता विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाचे आणि स्वतंत्र विचारक्षमतेचे केंद्र बनावीत, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध पद्धती
कार्यशाळेत केंद्रस्तरीय वाचनालयाची संकल्पना, आदर्श वाचनालयाची वैशिष्ट्ये, वाचन कोपऱ्यांचे व्यवस्थापन, पुस्तकांची योग्य मांडणी आणि पुस्तकांची देवाणघेवाण प्रक्रिया याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. बालसाहित्याची निवड, विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेनुसार पुस्तकांचे वर्गीकरण, वाचन कोपऱ्याची रचना आणि वाचनालयाच्या तासिकेचे नियोजन याविषयीही प्रशिक्षण दरम्यान सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी मोठ्याने वाचन, सामूहिक वाचन, जोडीने वाचन आणि स्वतंत्र वाचन या चार पद्धतींची प्रात्यक्षिके घेण्यात आली. शिक्षकांनी गोष्ट मोठ्याने वाचून दाखविणे, विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे वाचन करणे, एकमेकांच्या मदतीने पुस्तक वाचणे आणि स्वतःहून वाचन करणे अशा कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा वाचनातील प्रवाहीपणा, शब्दसंग्रह आणि मजकूर समजून घेण्याची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला.
वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजून घेणे, त्यावर प्रश्न विचारणे, स्वतःचे मत मांडणे आणि चिकित्सक विचार करणे ही कौशल्येही वाचनाच्या माध्यमातून विकसित करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ शब्द वाचण्यापुरते मर्यादित न राहता वाचलेल्या साहित्याचा अर्थ समजून घ्यावा आणि त्यातून स्वतःची अभिव्यक्ती विकसित करावी, यासाठी शिक्षकांना या दरम्यान मार्गदर्शन करण्यात आले.
निपुण भारताच्या उद्दिष्टांशी वाचनालयांचा संबंध
निपुण भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये वाचनालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे कार्यशाळेत स्पष्ट करण्यात आले. मौखिक भाषेचा विकास, शब्दसंग्रह वाढविणे, वाचन आकलन, लेखनातून विचार व्यक्त करणे आणि बालकेंद्रित अध्ययनाला प्रोत्साहन देणे या बाबींवर विशेष चर्चा करण्यात आली.
वाचन कोपऱ्याची जबाबदारी असलेले शिक्षक, वर्गशिक्षक आणि बाल वाचनालय व्यवस्थापन समिती यांच्या भूमिका व जबाबदाऱ्यांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. वाचनालयाचा नियमित वापर, पुस्तकांची उपलब्धता, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि वाचनासाठी आनंददायी वातावरण निर्माण करणे यांमुळे शाळांमधील अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक होऊ शकते, यावर भर देण्यात आला.
शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणाची पाहणी
जिल्हा परिषद पालघरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी कार्यशाळेला भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली आणि प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. रूम टू रीडच्या सहकार्याने जिल्ह्यात वाचन संस्कृती अधिक दृढ होण्यास मदत होईल. प्रत्येक बालकाने पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करावे, या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियानांतर्गत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करावी, यासाठी शाळांनी उपलब्ध वाचनालये आणि वाचन कोपऱ्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अधिकारी आणि मार्गदर्शकांचा सहभाग
निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
या कार्यशाळेत शिक्षण विभाग प्राथमिकचे विस्तार अधिकारी नितीन राऊत, जिल्हा गुणवत्ता कक्षाचे जिल्हा समन्वयक तानाजी डावरे, रूम टू रीड इंडिया ट्रस्टच्या प्रमुख मार्गदर्शक निक्की प्रेमानंद, माहिती तंत्रज्ञान समन्वयक आनंद अनेमवाड, तृप्ती जोंधळेकर, आंचला पिंपळे, कार्यक्रम सहयोगी प्रीतेश इजनकर, नितीन रोकडे आणि पालघर तालुका समन्वयक सचिन सपकाळ यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी कार्यक्रम सहाय्यक योगेश गवळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील आदर्श वाचनालये, केंद्रशाळा स्तरावरील वाचनालये आणि शाळांमधील वाचन कोपऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमाचे सातत्यपूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय विकसित होण्याबरोबरच त्यांची भाषा, आकलन आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
navyugpalghar.com
Facebook । X । Instagram । You Tube
#पालघर #जिल्हापरिषदपालघर #वाचनसंस्कृती #आदर्शवाचनालय #निपुणपालघर #शिक्षण #विद्यार्थी #NavyugPalghar