https://youtu.be/LqIacQGsb5Q?si=SNiDbnipAl6K6t49
#अलीकडेच जागतिक पर्यटन दिन साजरा झाला.... नेहमी प्रमाणेच आपल्या लोकप्रतिनिधींनी पर्यटन विकासाला किती वाव आहे, पर्यटन विकास ही काळाची गरज आहे... असे अनेक गोड सल्ले/आश्वासने दिली.. हे गेली अनेक वर्षे घडत आहे... मात्र ठोस काही केले जात नाही.... या पार्श्वभूमीवर नवयुग पालघरचे २८ सप्टेंबर २०२५ च्या अंकातील हे संपादकीय ...#
**पर्यटन विकास कसा होणार ?
तुमचा आराखडा जनतेसमोर ठेवा !**
* पालघर जिल्ह्यात सागरी, नागरी व डोंगरी पर्यटनाची अपार क्षमता आहे.१२० किलोमीटरचा समुद्रकिनारा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, गड–किल्ले, राजवाडे व धबधबे हे पर्यटकांना आकर्षित करणारे घटक आहेत.---खासदार हेमंत सवरा
“सागरी किनारे, डोंगर–दर्या, वारली संस्कृती, कला आणि अध्यात्मिक स्थळांचे संवर्धन करत पर्यटन व्यवसायाचे रूपांतर शाश्वत विकासात करणे ही काळाची गरज आहे,” आमदार राजेंद्र गावित
शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी दांडेकर महाविद्यालयात जागतिक पर्यटन दिनानिमित्त बोलतानाचे हे उद्गार आहेत.सत्ताधारी पक्षातील दोन्ही लोकप्रतिनिधी पर्यटन विकासाची गरज मान्य करतात, तर मग नक्की घोडे अडले कुठे असा प्रश्न उपस्थित होतो. पालघर जिल्हा निर्मिती झाल्यानंतर जागतिक पर्यटन कार्यक्रमात किंवा) केळवे, डहाणू आदी विविध ठिकाणी होणार्या पर्यटन
हीच टेप वाजवली जाते. पण प्रत्यक्षात जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने काही ठोस घडलेलं आहे असे दिसत नाही. हे खरंच आहे की, पालघर जिल्हा डोंगर, गड किल्ले, नद्या, समुद्र असा निसर्गसंपन्न जिल्हा आहे. हे असे क्षेत्र आहे, जिथे स्थानिकांना रोजगाराची प्रचंड संधी उपलब्ध होऊ शकते. अनेक ठिकाणी स्थानिकांनी हे दाखवून दिले आहे. मात्र या दृष्टीने काही मूलभूत सुविधा किंवा एक ध्येय/दृष्टीकोन (व्हिजन) समोर ठेवून काम होताना दिसत नाही.
पेव्हर ब्लॉक, शौचालय, समुद्रकिनारे स्वच्छ करण्याकरता आवश्यक यंत्रे (ज्याचा भार पुढे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना पेलता येत नाही,मग रिलायन्सच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो) केवळ या बाबी म्हणजे पर्यटन विकास नाही, इतकं तरी आमच्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात यायला हवं. खासदार सवरा आणि आमदार गावीत म्हणतात तसा पर्यटन विकास खरंच राज्य आणि केंद्रातील सरकारना हवा आहे का ? असा प्रश्न सद्यस्थितीत विचारल्यास वावगे ठरू नये. केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व लक्ष मोठे भांडवलदार आणि त्यांच्या प्रकल्पांकडे आहे. वाढवण, मुरबे बंदर, वस्रोद्योग प्रकल्प ही त्यांची उदाहरणे. केळवा- माहीमसारखा हरित पट्टा प्रदूषित होणार असेल तर मोकळी आणि स्वच्छ हवा घेण्याकरता पर्यटक या भागात का बरं येतील ? वाढवण बंदर झाल्यास शिरगाव सातपाटीपासून नांदगाव, डहाणू किनार्यावर पर्यटन यामुळे धोक्यात येणार नाही का ?हे एका बाजूने होत आहे, तर दुसर्या बाजूने याच प्रकल्पांसाठी डोंगर बोडके केले जात आहेत.म्हणजे निसर्ग संपवला जात आहे. मोठमोठे रस्ते, चौथी मुंबई यामध्ये हा निसर्ग संपवला जाणार असेल तर जिल्ह्याच्या पूर्वेकडील डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा मोखाडा यातील पर्यटनाचे काय होणार याचा विचार आमच्या लोकप्रतिनिधींनी केला आहे का ? वाढवणमुळे समुद्रावर आक्रमण झालेच आहे.यात मुरबेची भर पडणार आहे. प्रस्तावित सागरी मार्गामुळे हे आक्रमण अधिकच वाढणार आहे. हे वास्तव पर्यटन विकासाच्या आड येणार नाही का ? मात्र, याचा गांभीर्याने कोणी विचार करत नाही किंवा विचार केला तरी या लोकप्रतिनिधींच्या हातात फारसे काही राहिले आहे असे दिसत नाही. किंबहुना ते वरपर्यंत आपली ही भूमिका पोचवत नसावे.सवरा आणि गावित परवा म्हणाले ते खरेच आहे. परंतु आजूबाजूला सारे घडत असताना,आमचे सागरी किनारे,डोंगर- दर्या,वारली संस्कृती आदींचे संवर्धन आम्ही कसे करणार याचे उत्तर लोकांना मिळायला हवे.
जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे एक सर्वांगीण आराखडा/प्रतिमान लोकांसमोर येऊ द्या आणि मग या विकासाला बाधा येईल असे या भागात काही होणार नाही याची शाश्वती लोकांना द्या तरच आपण व्यक्त केलेल्या अपेक्षा खर्या ठरतील !