डहाणू तालुक्यात जिल्हा प्रशासनाचे बचावकार्य यशस्वी — १६ महिला व बसचालक सुखरूप बाहेर
पालघर, दि. २८ सप्टेंबर : 🌧️
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने तात्काळ केलेल्या बचावकार्यात मोठे यश मिळाले आहे. डहाणू तालुक्यातील चरी गावाजवळ पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या बसमधून १६ महिला आणि बसचालकासह एकूण १७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. वेळेवर केलेल्या समन्वयात्मक कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.
ही बचावकारवाई जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर काही तासांतच डहाणू परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. चरी गावाजवळील रस्त्यावरून जात असताना वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात बस अडकली. प्रवाशांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले.
या मोहिमेत डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे, तहसीलदार सुनील कोळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन पगारे, नगरपालिका कर्मचारी तसेच विविध शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून वेगवान कारवाई केली. बचावकार्यादरम्यान डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार जखमी झाले असून त्यांच्यावर डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बचाव करण्यात आलेल्या सर्व प्रवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत. वेळेत घेतलेली प्रशासनाची धडाडीची भूमिका आणि विविध विभागांतील समन्वयामुळे संभाव्य दुर्घटना टळल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.