पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; शेती, घरे, पशुपालनाचे मोठे नुकसान**** **विशेष आर्थिक पॅकेजसह तातडीच्या मदतीची कुणबी सेनेची मागणी; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा**

Date: 2026-07-23
news-banner

****पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; शेती, घरे, पशुपालनाचे मोठे नुकसान****
**विशेष आर्थिक पॅकेजसह तातडीच्या मदतीची कुणबी सेनेची मागणी; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा**

नवयुग पालघर | 19 जुलै : 

पालघर जिल्ह्यात  काही दिवसांपूर्वी  झालेल्या मुसळधार पावसाने शेती, घरे, पशुपालन आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भात पेरणी वाहून गेली, शेतजमिनींमध्ये दगड, रेती व गाळ साचला, घरे आणि गोठ्यांचे नुकसान झाले, तर मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गावरील अंडरपासमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांना शेतातही जाता आले नाही. या पार्श्वभूमीवर कुणबी सेना, पालघर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देत तातडीने पंचनामे, विशेष आर्थिक पॅकेज आणि नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.

कुणबी सेनेने दिलेल्या निवेदनानुसार, डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वसई या सर्व तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ओहळ, नाले आणि नद्यांना पूर आला. अनेक ठिकाणी बांध फुटल्याने पाण्याचा प्रचंड लोंढा थेट शेतांमध्ये घुसला. त्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात दगड, रेती आणि गाळ साचला असून अनेक शेतजमिनी शेतीयोग्य राहिलेल्या नाहीत.
यावर्षी मान्सून उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कर्ज काढून भाताची पेरणी केली होती. मात्र, अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरलेले भात बियाणे वाहून गेले. अनेक ठिकाणी पुन्हा पेरणीची संधीही मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अनेक गावांमध्ये नागरिकांच्या घरांचे अंशतः तसेच पूर्णतः नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, अन्नसाठा, घरगुती साहित्य, फर्निचर आणि विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर पोल्ट्री फार्म, गोठे, पशुखाद्य, जनावरांचा चारा आणि शेतीपूरक साधनसामग्रीचेही नुकसान झाल्याने पशुपालकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या. विशेषतः तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लालठाणे गावात दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे नुकसान झाले असून दोन विहिरी पूर्णपणे गाडल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कुणबी सेनेने मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गामुळे निर्माण झालेल्या समस्येकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महामार्गावरील अनेक अंडरपासमध्ये पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस शेतात प्रवेश करता आला नाही. ट्रॅक्टर, नांगर, रोटाव्हेटर आणि इतर शेती अवजारे शेतात नेता न आल्याने मशागत आणि पेरणी वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे रावते, बोरशेती, किराट, नागझरी, निहे, लोवरे, धुकटन, बहाडोली, साखरे, नावजे, गिराळे, पारगाव आदी गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

**कुणबी सेनेच्या प्रमुख मागण्या**
*सर्व बाधित भागांचे तात्काळ पंचनामे करावेत.
*शेती, घरे, पशुपालन आणि पोल्ट्री व्यवसायाच्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी.
*शेतांमधील दगड, रेती आणि गाळ हटविण्यासाठी विशेष अनुदान द्यावे.
*बाधित शेतकऱ्यांना मोफत बियाणे व कृषी साहित्य उपलब्ध करून द्यावे.
*फुटलेल्या बांधांची तातडीने दुरुस्ती करावी.
*मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गावरील अंडरपासमध्ये पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी.
*पालघर जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.

कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी,
प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करून सर्व बाधित शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave Your Comments