पालघर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर — पालघर पंचायत समितीचे पद प्रथमच बिगर आदिवासींसाठी खुले

Date: 2025-09-30
news-banner

https://youtu.be/r2rRwiBcefw?si=HGG3-PBJGyOd57op
📰 पालघर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर — पालघर पंचायत समितीचे पद प्रथमच बिगर आदिवासींसाठी खुले

पालघर | प्रतिनिधी
           पालघर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षणाची घोषणा आज मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली शाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी रणजित देसाई, उपजिल्हाधिकारी ( सा. प्र.) यांनी सर्व माहिती दिली. या आरक्षण प्रक्रियेत अनुसूचित जमाती महिला व अनुसूचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पालघर पंचायत समितीचे सभापतीपद हे यंदा प्रथमच बिगर आदिवासी वर्गासाठी खुले झाले आहे. त्यामुळे या पदासाठी सर्वच पक्षांमधील पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये चढाओढीची शक्यता आहे.

🟤 आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण स्पष्ट

         बैठकीच्या प्रारंभी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाविषयी माहिती देण्यात आली. हे पद राज्यस्तरावरून निश्चित करण्यात येते. याअंतर्गत पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याचे यापूर्वीच घोषित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील एकूण आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.

           डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या सहा पंचायत समित्या अनुसूचित क्षेत्रातील आहेत. त्यामुळे या सहाही समित्यांचे सभापतीपद अनुसूचित जमाती या वर्गासाठी राखीव राहते. या सहा पंचायत समित्या विभागून यातील तीन पदे अनुसूचित जमाती महिलांसाठी तर तीन पदे अनुसूचित जमाती वर्गासाठी राखीव राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यासाठी २०२० ते २०२५ हे आधार वर्ष म्हणून स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट करत यावेळेचे आरक्षणे चक्रानुक्रमे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

🌀 चक्रानुक्रमे आरक्षणानुसार पदवाटप

           मागील कार्यकाळातील (२०२०–२०२५) शेवटच्या अडीच वर्षात मोखाडा, डहाणू आणि विक्रमगड पंचायत समितींची सभापती पदे अनुसूचित जमातीसाठी तर जव्हार, वाडा आणि तलासरी पंचायत समित्यांची सभापती पदे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव होती अशी माहिती देऊन, या आधारे यावेळी चक्रानुक्रमे आरक्षण ठरविले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आलं.

      👉 त्यानुसार यावेळी मोखाडा, डहाणू आणि विक्रमगड पंचायत समित्यांची सभापती पदे अनुसूचित जमाती महिलांसाठी, तर जव्हार, वाडा आणि तलासरी पंचायत समित्यांची सभापती पदे अनुसूचित जमाती वर्गासाठी आरक्षित राहणार असल्याची घोषणा करण्यात आली.


🟡 पालघर आणि वसईत नागरिकांचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जमाती महिला आरक्षण

         यानंतर अनुसूचित क्षेत्राबाहेरील पालघर आणि वसई पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या दोन समित्यांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जमाती महिला अशी दोन आरक्षणे यापूर्वीच ठरलेली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

       👉 पालघर पंचायत समितीचे सभापतीपद मागील कार्यकाळात शेवटच्या अडीच वर्षात अनुसूचित जमातींसाठी राखीव होते. त्यामुळे यावेळी येथे अनुसूचित जमाती महिलांचे आरक्षण लागू होत नसल्याने नागरिकांचा मागास प्रवर्ग या वर्गासाठी हे पद राखीव राहणार असल्याचे घोषित करण्यात आले. 

     👉 वसई पंचायत समितीचे सभापतीपद मागील अडीच वर्षात सर्वसाधारण वर्गासाठी होते. त्यामुळे यंदा उर्वरित आरक्षणानुसार हे पद अनुसूचित जमाती महिलांसाठी घोषित करण्यात आले आहे.
       सभापती पदांसाठीची ही आरक्षणे सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी असतील. यावेळी प्रमोद कदम, तहसीलदार, (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, भूपेश नेरुरकर, नायब तहसीलदार निवडणूक, धर्मराज देशमुख, सहाय्यक महसूल अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


तालुकानिहाय सभापती पदांचे आरक्षण

तालुका पं. समिती आरक्षित        
                                प्रवर्ग
मोखाडा अनुसूचित जमाती महिला                
डहाणू अनुसूचित जमाती महिला
विक्रमगड अनुसूचित जमाती महिला
जव्हार अनुसूचित जमाती
वाडा अनुसूचित जमाती
तलासरी अनुसूचित जमाती
पालघर नागरिकांचा मागास प्रवर्ग
वसई अनुसूचित जमाती महिला

📝 राजकीय हालचालींना वेग येणार

          या आरक्षण प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सभापतीपदांसाठी उमेदवारीसाठी पक्षांतर्गत दावे-प्रतिदावे सुरू होतील. विशेषतः पालघर तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पद खुले झाल्याने विविध पक्षांतील इच्छुकांमध्ये अंतर्गत स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

Leave Your Comments