पालघर जिल्ह्यातील ४८ विशेष शिक्षक कायम — समावेशित शिक्षण उपक्रमाला नवे बळ — मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे

Date: 2025-09-30
news-banner
https://youtu.be/m4pkFTcwcVQ?si=-71aZwg4tRleIzDK

पालघर जिल्ह्यातील ४८ विशेष शिक्षक कायम — समावेशित शिक्षण उपक्रमाला नवे बळ
— मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे

पालघर, ३० सप्टेंबर २०२५ :
        “विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी समावेशित शिक्षण उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक ही या उपक्रमाला नवे बळ देणारी ठरेल. यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम व सर्वसमावेशक होईल, असा मला विश्वास आहे. विशेष शिक्षकांनी आपली जबाबदारी निष्ठा, संवेदनशीलता व आत्मीयतेने पार पाडावी, ही अपेक्षा आहे,” अशा भावना जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी व्यक्त केल्या.

          सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक १३२/२०१६ मधील निर्देश आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, पालघर जिल्ह्यातील कंत्राटी विशेष शिक्षकांना कायमस्वरूपी पदावर नियुक्ती देण्याबाबत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार, आज जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते एकूण ४८ विशेष शिक्षकांना कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले.

यात जिल्हा परिषद पालघर कार्यक्षेत्रातील ४०, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ०७, तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई कार्यालयातील ०१ विशेष शिक्षकांचा समावेश आहे.

         २००४ पासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (पूर्वी सर्व शिक्षा अभियान) विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समावेशित शिक्षण उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक गरजांची पूर्तता व्हावी म्हणून कंत्राटी तत्त्वावर विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. सुरुवातीला मानधन तत्त्वावर कार्यरत असलेले हे शिक्षक शासनाच्या निर्णयानुसार आता कायमस्वरूपी पदावर कार्यरत राहणार आहेत.

          पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १५० केंद्रशाळांपैकी ४८ केंद्रशाळांवर विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार असून समावेशित शिक्षण उपक्रमाला नवी उभारी मिळाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

          या कार्यक्रमास मनोज रानडे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपस्थित होते. त्यांनी सर्व नियुक्त विशेष शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी सदिच्छा दिल्या.

Leave Your Comments