https://mausam.imd.gov.in/mumbai/
🌧️ ३० सप्टेंबरपर्यंत पालघर जिल्ह्यासह राज्यात पावसाचा जोर वाढणार — हवामान खात्याचा इशारा
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; शहरी पुराचा धोका संभव
मुंबई : भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासह राज्यासाठी पावसाचा इशारा जारी केला असून ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शहरी भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आपत्कालीन कार्य केंद्राकडून नागरिकांना खालील सूचना देण्यात आल्या आहेत :
धोकादायक आणि पूरप्रवण भागात जाणे टाळावे.
विजेच्या कडकडाटासह पावसात झाडाखाली उभे राहू नये.
पुरस्थितीत नदी–नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडण्याचा धोका घेऊ नये.
अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घ्यावी.
पूरस्थितीत स्थानिक निवारा केंद्रांचा वापर करावा आणि अनावश्यक प्रवास किंवा पर्यटन टाळावे.
राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणा सतर्क असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.