🟠 ब्रेकिंग | नगरपरिषद, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीची ८ ऑक्टोबरला प्रसिद्धी
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार सह राज्यातील २४७ नगरपरिषदा व जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतसह राज्यातील ४२ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकीची तयारी वेगात
मुंबई, दि. १ (रानिआ) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या येत्या ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद तसेच वाडा नगरपंचायत यांचा यात समावेश आहे.
राज्यात एकूण २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपद व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत असेल, तर अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाणार आहे.
📌 विधानसभा मतदार यादीचाच आधार
राज्य निवडणूक आयोगाने यासाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभेच्या यादीतील मतदारांची नावे व पत्ते जसेच्या तसे ठेवले जातील.
📝 हरकती व दुरुस्त्यांची संधी
या प्रारूप मतदार याद्यांमध्ये नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा पत्त्यात बदल करणे अशा प्रकारच्या कारवाया राज्य निवडणूक आयोग करत नाही. तथापि, मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या मुद्रणदोष, चुकून प्रभाग बदलणे, किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नसणे अशा तांत्रिक त्रुटींच्या दुरुस्तीसाठी नागरिक हरकती व सूचना दाखल करू शकतात.
👥 निवडणूक प्रक्रियेचा पुढचा टप्पा
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राजकीय धावपळ अधिकच वाढणार आहे.
📅
📄 प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : ८ ऑक्टोबर २०२५
📝 हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख : १३ ऑक्टोबर २०२५
✅ अंतिम मतदार यादी जाहीर : २८ ऑक्टोबर २०२५
👉 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता व अचूकता राखण्यासाठी नागरिकांनी आपल्या मतदार याद्यांची तपासणी करून आवश्यक त्या हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.