https://youtu.be/sZrmjE_2OC8?si=zYjsgfoDHn5OF6nS
पालघर जिल्ह्यातील मद्यपींनी तब्बल ४ कोटी ९८ लाख ५ हजार ५१८ लिटर दारू ढोसली
निवडणूकपूर्व ऑक्टोबरमध्ये मद्यपानाचा ‘बूम’;
अवैध दारूविरोधातही कारवाईत वाढ
पालघर ०१ जानेवारी :
नवीन वर्ष सुरू होत असताना मागील वर्षाकडे वळून पाहिले असता पालघर जिल्ह्यातील एक अस्वस्थ करणारे वास्तव समोर येते. ०१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पालघर जिल्ह्यातील मद्यपींनी तब्बल ४ कोटी ९८ लाख ५ हजार ५१८ लिटर दारू ढोसली / रिचवली असल्याची नोंद अधिकृत आकडेवारीत आहे. यात बिअर, विदेशी दारू, देशी दारू व वाईन यांचा समावेश आहे. या कालावधीत जिल्ह्यात ३ कोटी २४ लाख १४ हजार ३६८ लिटर बिअर, ९१ लाख ४४ हजार ७४ लिटर विदेशी दारू, ८२ लाख ४७ हजार ७६ लिटर देशी दारू तसेच ६ लाख ४७ हजार ९० लिटर वाईन रिचवली गेली. महिन्यानुसार पाहता काही महिन्यांत ही आकडेवारी अचानक उसळी घेत असल्याचे चित्र दिसून येते.
विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२५ मध्ये मद्यपानात झालेली वाढ ही जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधून घेणारी आहे. पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद तसेच वाडा नगरपंचायत निवडणुकीची घोषणा ६ नोव्हेंबर रोजी झाली होती, तर प्रत्यक्ष मतदान २ डिसेंबर रोजी झाले. निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार हे अपेक्षित असतानाच, ऑक्टोबर महिन्यातच दारूची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. निवडणूक काळात वापरासाठी दारूची साठेबाजी याच काळात झाली असावी, असे म्हणण्यास वाव आहे.निवडणूक काळात दारूचा वापर कोणासाठी व कशासाठी होतो हे सर्वज्ञात आहेच.
ऑक्टोबर महिन्यात बिअर विक्रीत ५७.५३ टक्के, वाईन विक्रीत ५४.०९ टक्के, तर देशी दारू विक्रीत २१.१५ टक्के वाढ नोंदवली गेली. नोव्हेंबर महिन्यातही ही दारू विक्रीत वाढ राहिली.-बिअरच्या बाबतीत, ऑक्टोबर २०२४ मध्ये २२ लाख ८० हजार ३३ लिटर बिअर ढोसली गेली होती, तर २०२५ मध्ये ती ३५ लाख ९१ हजार ७१५ लिटरवर पोहोचली. म्हणजेच अवघ्या वर्षभरात १३ लाख ११ हजार ६८२ लिटर अधिक बिअर रिचवली गेली.
संपूर्ण वर्षाचा विचार करता, २०२४–२५ मध्ये २ कोटी ७८ लाख ५१ हजार ५४२ लिटर बिअर ढोसली गेली होती, तर २०२५–२६ मध्ये ही आकडेवारी ३ कोटी २४ लाख १४ हजार ३६८ लिटरवर पोहोचली, म्हणजेच ३६ लाख ६२ हजार ८२६ लिटरची वाढ झाली. वार्षिक तुलनेत पाहता, बिअर विक्रीत १२.७४ टक्के, देशी दारू विक्रीत ९.९३ टक्के, तर वाईन विक्रीत ६.४९ टक्के वाढ झाल्याचे दिसते. मात्र विदेशी दारू विक्रीत याच काळात ९.०६ टक्के घट नोंदवली गेली आहे.
देशी दारूच्या बाबतीत ऑक्टोबरनंतर नोव्हेंबरमध्ये १८.७४ टक्के, एप्रिलमध्ये १५.९१ टक्के, ऑगस्टमध्ये १४.६९ टक्के, तर मे महिन्यात १४.६२ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, डिसेंबर महिन्यात मद्यविक्रीत घट होण्याचा अंदाज असून बिअरच्या विक्रीत सुमारे ४४ टक्के घट, तर विदेशी दारूच्या विक्रीत तब्बल ५५.५३ टक्के घट झाल्याचे दिसते. सप्टेंबरमध्ये विदेशी दारू विक्रीत २८.९८ टक्के, तर ऑगस्टमध्ये २२.७२ टक्के घट नोंदवली गेली होती.
अधिकृत दारू विक्रीबरोबरच अवैध दारूविरोधातील कारवाईही वाढलेली आहे. जानेवारी ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत १७९० गुन्हे नोंदवून १० कोटी ८९ लाख ७४ हजार ६१६ रुपये किमतीची अवैध दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात १८२२ जणांना अटक करण्यात आली. गतवर्षी याच काळात १३५३ गुन्ह्यांत ७ कोटी ८४ लाख २७ हजार ४४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. म्हणजेच जप्तीमध्ये ३८.९० टक्क्यांची वाढ झाली असल्याचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी म्हटले आहे.
एकीकडे जिल्ह्यात वर्षभरात कोट्यवधी लिटर दारू ढोसली जात असताना, दुसरीकडे अवैध दारूविरोधात गुन्हे वाढत आहेत. निवडणूक काळात दारूवर बंदी असतानाही निवडणूकपूर्व महिन्यात झालेली प्रचंड खरेदी, लोकशाही प्रक्रियेच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच समोर आलेली ही आकडेवारी एका बाजूने सरकारला महसूल मिळवून देणारी तर दुसऱ्या बाजूने सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आणि निवडणूक संदर्भ लक्षात घेतल्यास वेगळीच चिंता वाढवणारी असे म्हणता येईल.म्हणून ही केवळ आकड्यांची नोंद नसून, पालघर जिल्ह्याच्या सामाजिक वास्तवाचे विदारक चित्र मांडणारी ‘मद्यकहाणी’ देखील ठरत आहे.