वाड्यात काँग्रेसचा शेतकरी हक्कासाठी धडक मोर्चा ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी, नुकसानभरपाई, बोनस आणि पिकविमा तातडीने द्यावा – काँग्रेसची मागणी

Date: 2025-11-02
news-banner
वाड्यात काँग्रेसचा शेतकरी हक्कासाठी धडक मोर्चा
‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी, नुकसानभरपाई, बोनस आणि पिकविमा तातडीने द्यावा – काँग्रेसची मागणी

https://youtu.be/o96JTw5v_bA?si=Z4DsiE3ArhYgpn21

पालघर : वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार सकाळी काँग्रेसच्या वतीने खंडेश्वरी नाका येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढलेल्या या मोर्चातून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी करून ७/१२ उताऱ्यावरील कर्जनोंदी कोऱ्या कराव्यात, पिकविम्याची रक्कम तातडीने खात्यात जमा करावी, नुकसानभरपाई व बोनस तत्काळ द्यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने शासनावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कायम उदासीनतेने पाहत असल्याचा आरोप केला.

मोर्चादरम्यान पंजाब राज्याच्या धर्तीवर प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच परतीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय प्रति हेक्टर ४० हजार रुपयांचा बोनस सर्व शेतकऱ्यांना द्यावा आणि ज्यांना अद्याप बोनस मिळालेला नाही त्यांना तातडीने वितरित करावा, असेही नमूद करण्यात आले.

खावडा व इतर कंपन्यांकडून सुरू असलेल्या विद्युत वाहिनी व मनोऱ्यांच्या कामामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, तसेच प्रांताधिकारी कार्यालयासमोर ८ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

या सर्व मागण्यांचे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांना देण्यात आले.

या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, दिलीप पाटील, सुनिल पाटील, प्रल्हाद सावंत, तसेच वाडा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Your Comments