https://youtu.be/A8IqePZrmR0?si=zDvuvwBoHnNiTMkg
“मराठी ही समाजाला जोडणारी शक्ती” — अभिजात मराठी राजभाषा दिवस व सप्ताहाचा उत्साहात आरंभ
पालघर, दि. ३ ऑक्टोबर :
मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा उत्सव म्हणून अभिजात मराठी राजभाषा दिवस व मराठी भाषा सप्ताह (३ ते ९ ऑक्टोबर २०२५) यांचा उत्साहपूर्ण शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध साहित्यिक, कवी व गीतकार प्रसाद कुलकर्णी यांच्या भावस्पर्शी भाषणाने झाली. त्यांनी संत साहित्य परंपरेपासून आधुनिक काळातील साहित्यिक योगदानापर्यंतचा मागोवा घेत मराठी भाषेचे साहित्यिक वैभव अधोरेखित केले.
तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोदी कलाकार प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी आपल्या खुमासदार शैलीत मराठी भाषेची दैनंदिन जीवनातील लय, विनोद आणि आत्मीयता उलगडून सांगत उपस्थितांना हशा व विचारांच्या सुरेल संगमात नेले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी भूषवले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब पटांगडे, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रणजित देसाई, शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक पाटील यांची उपस्थिती होती. विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
🌿 “मराठी ही प्रेमळ, जोडणारी भाषा” — जिल्हाधिकारी डॉ. जाखड
> “मराठी ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारे बंधन आहे. तिचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. जगातील प्रगत राष्ट्रांनी आपल्या मातृभाषेचा सन्मान राखला आणि त्याच बळावर जागतिक स्तरावर प्रगती साधली — आपल्यालाही तसाच दृष्टिकोन ठेवायला हवा.”या शब्दांत मराठी भाषेचे महत्त्व जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी अधोरेखित केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई, महेश सागर, शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक पाटील, साहित्यिक, कवी व गीतकार प्रसाद कुलकर्णी, हास्य सम्राट अजितकुमार कोष्टी तसेच वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला, तो क्षण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाचा क्षण होता. मी त्यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका येथे कार्यरत होते. तिथे झालेल्या अभिजात मराठी भाषा या भव्य कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वासासह अभिमानाची भावना दिसून आल्याचे सांगून शासनाने हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड म्हणाल्या.
📝 भाषा आणि संस्कृती पिढ्यानपिढ्या पोहोचवण्याचा संकल्प
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी कार्यक्रमाचे व वक्त्यांचे कौतुक करताना ,“मराठी भाषेचा गौरव साजरा करणारा हा सप्ताह खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा उपक्रमांमुळे आपली भाषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल.”असा विश्वास दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी रणजित देसाई यांनी केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी आभारप्रदर्शन करून सर्व शाळा, महाविद्यालये व विभागांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. जतिन कदम व प्रतिभा कदम यांनी सूत्रसंचालन केले.