तलासरीत प्रेमसंबंधातून खून; २४ तासांत गुन्ह्याची उकल, पत्नींसह प्रियकर अटकेत

Date: 2026-06-03
news-banner
नवयुग पालघर 

**तलासरीत प्रेमसंबंधातून खून; २४ तासांत गुन्ह्याची उकल, पत्नींसह प्रियकर अटकेत**
पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात घडलेल्या खूनप्रकरणाची पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उकल करत दोन आरोपींना अटक केली आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून मृताच्या पत्नीचाही कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे.

तलासरी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, २० मे रोजी राजन कलानभाई माछी (वय ५६, रा. पलगाव अगरमोरा फळिया, ता. उमरगाव, जि. वलसाड, गुजरात) यांनी त्यांचा मुलगा इतेशभाई राजन माछी (वय ३३) याचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची फिर्याद दिली होती. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि तलासरी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जेरी बाबू माछी (वय ३६, रा. पलगाव महादेव फळिया, ता. उमरगाव, जि. वलसाड, गुजरात) याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली असून मृत इतेशभाई यांची पत्नी श्रीमती जेरी माछी (वय ३२) हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. या संबंधातूनच इतेशभाई यांचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. तसेच खूनप्रकरणात मृताच्या पत्नीचाही सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय गोरड हे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

Leave Your Comments