नवयुग पालघर :
**बहुजन विकास आघाडीचा जिल्ह्यात १० हजार सक्रिय कार्यकर्ते नोंदणीचा लक्ष्यांक **
पालघर जिल्ह्यात तब्बल १० हजार सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी करण्याचा लक्ष्यांक डोळ्यासमोर ठेवत बहुजन विकास आघाडीच्या “सदस्यता नोंदणी अभियान २०२६”चे उद्घाटन क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अभियानामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नव्या जोमाने सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडी सर्वेसर्वा तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर, वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजिवजी पाटील, पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, नागेश पाटील तसेच अभियानाचे संयोजक पीटी पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी सदस्यता नोंदणी अभियानास शुभेच्छा देत संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजक पीटी पाटील यांनी पालघर जिल्ह्यात १० हजार सक्रिय कार्यकर्ते तयार करण्याचा निर्धार व्यक्त करत हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे नमूद केले.