मातीच्या आखाड्यातून राष्ट्रीय रंगमंचावर सफाळेच्या भावनाची कबड्डीतील संघर्षमय यशकथा

Date: 2026-01-03
news-banner
मातीच्या आखाड्यातून राष्ट्रीय रंगमंचावर
सफाळेच्या भावनाची कबड्डीतील संघर्षमय यशकथा

https://youtu.be/gQhV75MqEx8?si=M2UQR-XVZa849kfO

सातवीत शिकणारी १३ वर्षांची मुलगी, मनात स्वप्नं आणि अंगात अपार जिद्द घेऊन कबड्डीच्या आखाड्यात उतरते—आणि काही वर्षांतच ती महाराष्ट्र संघाची खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपदाची मानकरी ठरते. ही केवळ वैयक्तिक कामगिरी नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या क्रीडा क्षमतेवर शिक्कामोर्तब करणारी यशकथा आहे. ही यशकथा आहे सफाळे येथील डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेच्या राजगुरू हरेश्वर महादेव पंडित विद्यालयाची विद्यार्थिनी भावना दरगाराम मीणा हिची. २०२२ मध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत असताना अवघ्या १३ व्या वर्षी भावनाने १४ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघातून खेळण्यास सुरुवात केली. पहिल्याच वर्षी तिच्या अष्टपैलू खेळामुळे शाळेचा संघ थेट मुंबई विभागीय स्पर्धेपर्यंत पोहोचला.
 पुढे २०२३ मध्ये मुंबई विभागीय स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटातून खेळताना भावनाने उत्कृष्ट कामगिरी करत संघाच्या यशात निर्णायक भूमिका बजावली. तिच्या प्रभावी खेळाच्या जोरावर शाळेच्या संघाला मुंबई विभागाचे उपविजेतेपद मिळाले.
 २०२४ मध्ये मागील स्पर्धांतील कामगिरीची दखल घेत भावनाची १७ वर्षाखालील वयोगटात निवड करण्यात आली. २०२४–२५ या कालावधीत तिने कठोर प्रशिक्षण, नियमित व्यायाम व सातत्यपूर्ण सराव करत शालेय तसेच कबड्डी असोसिएशनच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि २०२५ च्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्वतःला सिद्ध केले.
डिसेंबर १०, ११ व १२, २०२५ रोजी संगमनेर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत भावनाची कामगिरी व संघातील उपयुक्तता लक्षात घेऊन राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड करण्यात आली. त्यानंतर २३, २४ व २५ डिसेंबर २०२५ रोजी कोकमठाण, शिर्डी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकावले.
राजगुरू हरेश्वर महादेव पंडित विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने राज्यस्तर गाठण्याचा मान मिळवला असून, या ऐतिहासिक यशात भावनाचा मोलाचा वाटा आहे.
भावनाच्या या यशामागे तिचे कुटुंबीय, डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या मधुमती कुलकर्णी, क्रीडा शिक्षक रमाकांत घरत, अनिल वझे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशिक्षक विशाल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने व सहाय्यक क्रीडा अधिकारी गिरीश इर्नाक यांनी दिलेल्या विशेष मार्गदर्शनामुळे तिच्या खेळाला योग्य दिशा मिळाली. घरकाम करणाऱ्या आईने प्रतिकूल परिस्थितीत भावनाचा हा मार्ग प्रशस्त केला, त्यामुळे या यशात आईचे स्थान निःसंशय मोठे आहे.

या उज्ज्वल यशाची दखल घेत शाळेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शाळा परिसरात मिरवणूक काढून फुले उधळत भावनाचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांनी केलेल्या अभिनंदनामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.
भावनाची ही यशोगाथा क्रीडा क्षेत्रात स्वप्ने पाहणाऱ्या असंख्य विद्यार्थिनींसाठी प्रेरणास्थान ठरत असून, मेहनत आणि संधी यांची सांगड घातली तर यश निश्चित मिळते, हे भावनाच्या यशाने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave Your Comments