https://youtu.be/BkCb6aRTl6A?si=E4N1to_IBpHKItyW
मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा गौरव — आर्यन शाळेत सन्मान दिन उत्साहात साजरा
पालघर | ३ ऑक्टोबर २०२५
“मराठी भाषेची प्राचीनता, स्वयंभूपणा आणि समृद्ध वाङ्मय परंपरा हीच तिच्या अभिजात दर्ज्याची खरी ओळख आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी झालेला संघर्ष प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे,” असे प्रा. विवेक कुडू यांनी सांगितले. “अभिजात मान मिळाल्यामुळे मराठीला जागतिक सांस्कृतिक ओळख प्राप्त झाली आहे, आता तिचे संवर्धन व प्रसार ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. सुशील शेजुळे यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म. नी. दांडेकर हायस्कूलमध्ये अभिजात मराठी भाषा सन्मान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दांडेकर कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. विवेक कुडू आणि मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. सुशील शेजुळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
प्रा. विवेक कुडू यांनी, “एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्या भाषेची प्राचीनता, ज्येष्ठता, स्वयंभूपणा, आणि सलगता तपासली जाते. २०१२ ला रंगनाथ सामील स्थापन झाली व बारा वर्षाच्या संघर्षानंतर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला. मराठीमध्ये अनेक समाजात बोलीभाषा आहेत त्याही आपण बोलल्या पाहिजेत.”असे आवाहन केले.
“अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला सांस्कृतिक, ऐतिहासिक ओळख मिळाली आहे. जागतिक स्तरावर ओळख मिळालेली आहे, यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवावी या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही संघर्ष केला. छोट्या मुलांना तीन-तीन भाषा आकलन होणे कठीण आहे. मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी भाषेचे वाङ्मय मोठ्या प्रमाणात निर्माण झाले पाहिजे व वाचले गेले पाहिजे. लहान मुलांचा किशोर अंक सर्व शाळांमध्ये वाचला गेला पाहिजे. अनेक शाळांमध्ये मी स्वतः हा अंक पाठवत आलो आहे.”असे प्रा. शेजुळे म्हणाले,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्यन संस्थेचे अध्यक्ष श् केदार काळे होते. त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात सक्रीय वापर करण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रात हॉटेलपासून शासकीय कार्यालयांपर्यंत सर्वत्र मराठीत व्यवहार करणे आपले कर्तव्य आहे. समाजमाध्यमांवरही मराठी भाषेचा वापर वाढवायला हवा,” असे ते म्हणाले. विमान कंपन्यांनी आपल्या सेवांमध्ये मराठी भाषेचा वापर करावा यासाठी केलेल्या लढ्याचाही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमाला संस्थेचे कार्यवाह जयंत दांडेकर, शाळा समितीचे अध्यक्ष उपेंद्र घरत, मुख्याध्यापिका विभूती चौधरी, उपमुख्याध्यापिका माधवी लाल, कार्यकारिणी सदस्य प्रज्ञा ठाकूर, शिक्षक निलेश भोईर तसेच मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.