**सेवानिवृत्तीनिमित्त रवींद्र शिंदे यांच्या कारकिर्दीचा गौरव **
जिल्हा परिषद पालघरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. 30 मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्यालयातील जननायक बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
अन्य एका कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्तेही रवींद्र शिंदे यांचा कुटुंबियांसमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांना निवृत्तीचे लाभही सुपूर्द करण्यात आले
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात रवींद्र शिंदे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता आणि लोकाभिमुख दृष्टिकोन या गुणांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येतो. प्रशासनात ठाम निर्णयक्षमता आणि सर्वसामान्यांप्रती असलेली संवेदनशीलता यांचा त्यांनी उत्कृष्ट समतोल राखला, असे त्यांनी नमूद केले. यावेळी शिंदे यांच्या कुटुंबीयांचाही सन्मान करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आपल्या शिंदे यांच्यासोबतचे अनुभव समोर ठेवले. त्यांच्या कामातील काटेकोरपणा, निर्णयक्षमता आणि कठोरतेसोबतच माणूसपणाच्या जपणुकीचा उल्लेख करत “शिस्त आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधणारा अधिकारी” अशी त्यांची ओळख कायम राहील, असे सांगितले.
तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनीही शिंदे यांच्यासोबतच्या प्रशासकीय तसेच वैयक्तिक अनुभवांना उजाळा देत त्यांच्या समन्वयक्षमतेचे कौतुक केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुसूत्रता राखत कामे प्रभावीपणे पूर्ण करण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या मनोगतात रवींद्र शिंदे यांनी प्रदीर्घ सेवाकाळाचा आढावा घेताना विविध पदांवर काम करताना आलेले अनुभव, आव्हाने आणि त्यावर केलेली मात यांचा उल्लेख केला. प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांना प्राधान्य देत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवता आले, असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच आपल्या यशामागे आई-वडिलांची मोलाची साथ असल्याचे नमूद करत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी शिंदे यांचे पुत्र तन्मय शिंदे यांनी अमेरिकेतून व्हिडिओद्वारे भावना व्यक्त करत वडिलांविषयीचा अभिमान व्यक्त केला. मुलगी हर्षाली शिंदे तसेच जिल्हा परिषद सदस्या भावना विचारे यांनीही आपल्या मनोगतातून शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वातील कर्तव्यनिष्ठा, साधेपणा, कुटुंबवत्सलता आणि माणुसकीचा विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमात रवींद्र शिंदे यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीचा आढावा घेणारी विशेष चित्रफीत सादर करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध विकासकामे, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांचे प्रभावी दर्शन या चित्रफितीतून घडले.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे, उपजिल्हाधिकारी (सा) रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्या नीता पाटील, हबीब शेख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिंदे यांचे वडील उद्धवराव शिंदे, पत्नी अनिता शिंदे, मुलगी हर्षाली शिंदे आदी कुटुंबीयांचीही उपस्थिती होती.
भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांनी रवींद्र शिंदे यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.