ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर दांडेकर यांची सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या उपाध्यक्षपदी निवड

Date: 2026-04-04
news-banner
नवयुग पालघर

 ** ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर दांडेकर यांची सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या उपाध्यक्षपदी निवड**

            सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे जेष्ठ सदस्य सुधीर दांडेकर (रामकृष्ण गोविंद दांडेकर) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ते पालघरमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून अभ्यासू, वाचनप्रिय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी पालघर रोटरी क्लबचे अध्यक्षपदही यशस्वीरीत्या भूषविले आहे.

         सुधीर दांडेकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ संस्थेला भरीव देणगी दिली असून संस्थेच्या विविध उपक्रमांना त्यांनी सातत्याने हातभार लावला आहे. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत व विचारवंत सोनोपंत दांडेकर यांचा भव्य पुतळा महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. त्यासाठी देणगी गोळा करून हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

            याशिवाय, विधी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी ॲड. प्रकाश करंदीकर कुटुंबीयांकडून मोठी देणगी मिळवून देण्यातही त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ‘आप्पासाहेब दांडेकर स्मृती व्याख्यानमाला’ तसेच ‘अक्षरवेध’ साहित्य संस्था आणि ‘पुस्तकमित्र मंडळ’ हे त्यांनी स्वतः सुरू केलेले उपक्रम त्यांच्या साहित्यिक अंगाची ओळख करून देतात.

महाविद्यालयात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना नवनवीन शैक्षणिक प्रकल्प उपलब्ध करून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, “संस्थेच्या प्रगतीचा सातत्याने विचार करणारे आणि शैक्षणिक उपक्रमात सक्रिय सहभाग असलेले सुधीरभाऊ उपाध्यक्षपदी निवडले जाणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष सीए. सचिन कोरे यांनी व्यक्त केली.

Leave Your Comments