वेदनेवर फुंकर घालण्याबरोबरच संघर्षाची धगही पेटती ठेवा - ऍड . इंदवी तुळपुळे

Date: 2025-11-04
news-banner
वेदनेवर फुंकर घालण्याबरोबरच संघर्षाची धगही पेटती ठेवा - ऍड . इंदवी तुळपुळे 


 वेदनेवर फुंकर घालून ती कमी करणे, हा माणुसकीचा स्वभाव आहे; पण त्या वेदनेमागील अन्याय संपवण्यासाठी संघर्षाची धगही जिवंत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ऍड . इंदवी तुळपुळे यांनी केले. आरोहन या सामाजिक संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त जव्हार येथे आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानी बोलत होत्या. यावेळी टाईम्स ऑफ इंडिया डिजिटलच्या वरिष्ठ सहाय्यक संपादक अलका धुपकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
 ऍड . तुळपुळे यांनी पुढे बोलताना, सामाजिक संस्थांच्या कार्याला मर्यादा असल्याने लोकांनी शासनाशी झगडून आपले हक्क मिळवले पाहिजेत असे आवाहन केले. तसेच स्वयंसेवी संस्थांनी प्रकल्प राबविण्याबरोबरच लोकचळवळी उभ्या करण्याची गरज आहे. त्यातूनच लोकशाही अधिक जिवंत राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अलका धुपकर यांनी आपल्या भाषणात ,”“आजच्या गढूळ राजकीय-सामाजिक परिस्थितीत गरीबांना न्याय आणि योजनांचा लाभ मिळवणे कठीण झाले आहे. अशा काळात आरोहन संस्थेने आरोग्य व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले . कुपोषणाच्या समस्येबाबतीत शासनाची संवेदना हरवल्याची खंत व्यक्त करत, लोकांनी याकडे सजगपणे लक्ष ठेवावे आणि कृतीशील व्हावे,असे आवाहन त्यांनी केले. तसेच,“मुलींनी शिकावे म्हणजे फक्त ‘चांगले लग्न’व्हावे म्हणून नाही,तर स्वत:च्या हिंमतीवर सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण घ्यावे असेही त्यांनी मुलींच्या शिक्षणावर भर देताना सांगितले.
 माजी आमदार सुनील भुसारा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “जव्हार-मोखाडा या आदिवासी भागात आरोहनने आरोग्य, शिक्षण, शेतीविकास आणि जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य हे प्रेरणादायी असल्याचे सांगून याच कामातून प्रेरणा घेऊन आमदारकीच्या काळात आपण पालघर जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नारकर यांनी आरोहनच्या दहा वर्षांच्या प्रवासाचा आढावा सादर करत, दुर्गम भागात केलेल्या कार्यांची माहिती दिली. संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक कौस्तुभ घरत यांनी विविध प्रकल्प आणि उपक्रमांचा विस्तृत आढावा मांडला. विविध गावांतील नागरिकांनी संस्थेबद्दल मनोगते व्यक्त करून अनुभव मांडले.
 या सोहळ्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमापैकी मॅरेथॉन स्पर्धेत ३०० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच निबंध स्पर्धेत २५० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धातील विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, चषक आणि रोख बक्षिसे देण्यात आली. आदिवासी भागातील रक्ताच्या तुटवड्याची जाणीव ठेवून पतंगशहा कुटीर रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले, ज्यात माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासह २५ जणांनी रक्तदान केले. तसेच विज्ञान प्रदर्शन, महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री या उपक्रमांचाही समावेश होता.
 कार्यक्रमास संस्थेच्या संस्थापक विश्वस्त अंजली कानिटकर, हेलन जोसेफ, नरेश जेना, वर्षा फातरपेकर आदींसह जव्हार, मोखाडा, डहाणू आणि पालघर तालुक्यांतील नागरिक, युवा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Your Comments