सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वेढी येथे ‘धम्म चेतना’ ग्रंथालयाचे उद्घाटन

Date: 2026-01-05
news-banner
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वेढी येथे ‘धम्म चेतना’ ग्रंथालयाचे उद्घाटन

https://youtu.be/IPe8QvodfQ4?si=HqQB9beSi44PCJWn

             स्त्री शिक्षण, समता व सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालघर तालुक्यातील वेढी गावात ‘धम्म चेतना’ या ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. बौद्धाचार्य श्रीपाद शेलार यांच्या निवासस्थानी स्थापन करण्यात आलेल्या या ग्रंथालयाचे उद्घाटन साहित्यिक संदीप महाडीक यांच्या हस्ते करण्यात आले.
             उद्घाटनप्रसंगी बोलताना साहित्यिक संदीप महाडीक यांनी वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत, ग्रंथालये ही समाज परिवर्तनाची प्रभावी साधने असल्याचे नमूद केले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात वाचनाची आवड निर्माण करणे, युवकांना वैचारिक दिशा देणे आणि सामाजिक प्रबोधन घडवून आणणे या उद्देशाने ‘धम्म चेतना’ ग्रंथालयाची स्थापना करण्यात आल्याचे आयोजकांनी यावेळी स्पष्ट केले.

         कार्यक्रमास पालघर बौद्ध युवक मंडळाचे अध्यक्ष विनोद मोरे, ग्रामपंचायत वेढीचे सरपंच नचिकेत पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन लोखंडे, ॲड. निलेश राऊत, माजी सरपंच विलास वैती व राजेंद्र भोईर यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राणे व नंदिनी जाधव यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे स्मरण करून नितीजा शेलार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Leave Your Comments