नवयुग पालघर
**तारापूर पोलिसांनी मंगळसूत्र चोरास केली अटक**
तारापूर पोलिसांनी मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
२५ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजता कुडण नवपाडा येथील ६३ वर्षीय महिला भाजीपाला विक्री करून घरी परतत असताना बसथांब्याजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाचे, अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता.
या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दर्शन जगदीश मोरे (वय ४४) व प्रणेश सुरेंद्र पाटील (वय २६, दोघेही रा. घिवली, ता. जि. पालघर) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच-४८-सीडब्ल्यू-०५१५ क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास तारापूर पोलीस ठाणे करीत आहे.