वाघोबा खिंडीत एसटी बस ट्रकवर आदळली; सहा प्रवासी जखमी, २२ जण बचावले

Date: 2026-06-07
news-banner
नवयुग पालघर

**वाघोबा खिंडीत एसटी बस ट्रकवर आदळली;     
   सहा प्रवासी जखमी, २२ जण बचावले**

           मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे गावाजवळील वाघोबा खिंडीत रविवारी सकाळी झालेल्या अपघातात कोल्हापूर-बोईसर एसटी बस पुढे जात असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. तीव्र उतारावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून बसमधील २२ प्रवाशांचा बचाव झाला.
            मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून बोईसरकडे निघालेली एसटी बस सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास वाघोबा खिंडीतील उतारावरून जात होती. यावेळी पुढे असलेल्या ट्रकवर बस वेगाने धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तर मुख्य प्रवेशद्वार ट्रकच्या बाजूला अडकून बंद झाले.
             अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही काळ प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथक, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षा कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखत बसचे आपत्कालीन दार उघडून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य मोठी घटना टळली.
            अपघातात जखमी झालेल्या सहा प्रवाशांना तातडीने मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे गुजरातकडे जाणार्‍या महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

Leave Your Comments