“स्वतःशी स्पर्धा करा, समाजासाठी काम करा” – प्राचार्य डॉ. किरण सावे दांडेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर उत्साहात संपन्न

Date: 2026-01-08
news-banner
“स्वतःशी स्पर्धा करा, समाजासाठी काम करा” – प्राचार्य डॉ. किरण सावे
दांडेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर उत्साहात संपन्न

https://www.instagram.com/p/DTPspC7jDLq/?igsh=ODY0bHd4bjE4ZWNi

पालघर : स्वयंविकास, समाजसेवा आणि सामाजिक जाणीव या त्रिसूत्रीवर आधारित युवक घडवणूक हीच राष्ट्रीय सेवा योजनेची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. ते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी शिबिरास भेट देताना विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत तांदूळवाडी–उचावली येथील नाईक फाउंडेशन येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासासोबतच समाजातील विविध प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता.
शिबिराच्या पहिल्या दिवशी स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छता अभियान राबवून शिबिराची सकारात्मक सुरुवात केली. २५ डिसेंबर रोजी योगसत्राने दिवसाची सुरुवात झाली. या सत्रासाठी प्रा. सुरेश हसबे, प्रा. योगेश आक्रेकर व महेश राऊत उपस्थित होते. त्यानंतर “अवयवदान – काळाची गरज” या विषयावर मोहन फाउंडेशनचे निखिल नगरकर व प्रचिती माळी यांनी मार्गदर्शन करत अवयवदानाविषयी असलेले गैरसमज दूर केले. याच दिवशी माजी कार्यक्रम अधिकारी सचिन उराडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, स्पर्धा परीक्षा तसेच नीती आयोग याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
२६ डिसेंबर रोजी उचावली गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर नागरी संरक्षण दल, पालघर येथील निलेश वझे यांनी “आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजना सोप्या भाषेत स्पष्ट केल्या.
२७ डिसेंबर रोजी उचावली गावात दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. सकाळच्या सत्रात वसई येथील गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाचे प्रा. जगदीश संसारे यांनी पथनाट्य सादरीकरणाविषयी मार्गदर्शन केले. दुपारी नाईक फाउंडेशन परिसरात स्वच्छता व रंगकाम करण्यात आले. यावेळी सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळींचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी, सांस्कृतिक समिती कार्याध्यक्ष सुधीर दांडेकर, अमिता राऊत, सुरेश जोशी, प्राचार्य डॉ. किरण सावे, प्रा. विवेक कडू यांच्यासह मेघा कोरे, शैला कुलकर्णी, अस्मिता पंडित, नेत्रा सावे व समिधा कडू यांनी शिबिरास भेट दिली.
यावेळी अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांनी आत्मविश्वास हा यशाचा पाया असल्याचे नमूद केले. सदस्य सुधीर दांडेकर यांनी व्यक्तिमत्त्व विकासात वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर डॉ. किरण सावे यांनी “विद्यार्थ्यांनी इतरांशी नव्हे, तर स्वतःशी स्पर्धा करावी” असा संदेश दिला. 
२८ डिसेंबर रोजी तांदूळवाडी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. २९ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत परिसर व शाळेसमोरील भाग स्वच्छ करण्यात आला. याच दिवशी नेत्रदान विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले तसेच “युवक आणि स्वामी विवेकानंद” या विषयावर प्रशांत पाटील यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
३० डिसेंबर रोजी शिबिराची सांगता झाली.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रा. विवेक कडू यांच्यातर्फे
 कु. रक्षाली धोंडे व कु. सार्थक रोकडे यांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पारितोषिके प्रदान करण्यात आली.
नितेश पागे, सचिन दिंडा व अमोल ठाकूर यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी झाले. प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ व डॉ. महेश देशमुख यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिबिराचे आयोजन डॉ. अरुंधती बर्डे, डॉ. राजू तांडेल, डॉ. संगीता ठाकूर, डॉ. प्रकाश घरत, प्रा. नेहा उराडे व प्रा. ध्रुविका सावे यांनी केले.

Leave Your Comments