नवयुग पालघर
**सफाळ्याच्या विधीशची जागतिक सुवर्ण झेप; पालघरचा अभिमान उंचावला**
"जिल्हा-राज्य- राष्ट्रीय पातळीवर चमक दाखव आता थेट जागतिक सुवर्णपदक*
यशामागे अनेकदा संघर्षाची, त्यागाची आणि सातत्यपूर्ण मेहनतीची कहाणी दडलेली असते. पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थी कु. विधीश जयेश राऊत याची यशोगाथा याचाच प्रत्यय देणारी आहे. योगसाधनेप्रती असलेले समर्पण, अभ्यासातील सातत्य आणि कुटुंबीयांचे पाठबळ यांच्या जोरावर विधीशने राज्य, राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था, सफाळे संचालित कै. चंद्रप्रभा चित्तरंजन श्रॉफ इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी असलेला विधीश आज पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. अलीकडेच झालेल्या पहिल्या जागतिक योगसाधना स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावत शाळा, पालक, शिक्षक आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
मात्र हे यश एका दिवसात मिळालेले नाही. योगाची आवड त्याच्यासाठी केवळ छंद नव्हती, तर ती त्याची साधना होती. सुरुवातीला आई-वडिलांनी घरच्या घरी मार्गदर्शन केले. त्याचे कौशल्य लक्षात आल्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज भासू लागली. मात्र परिसरात योगाचे प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने त्याला दरवेळी चार स्टेशन पुढे जाऊन सराव करावा लागत असे.
संध्याकाळची ट्रेन पकडून प्रशिक्षणासाठी जाणे, रात्री परतीची गाडी नसल्याने तिथेच मुक्काम करणे आणि सकाळच्या पहिल्याच ट्रेनने परत येऊन शाळेत हजर राहणे, हा त्याचा दिनक्रम होता. योग शिबिरे, सराव आणि स्पर्धांसाठी बाहेरगावी जावे लागले तरी अभ्यासात कोणतीही तडजोड त्याने कधी केली नाही. त्यामुळे तो योगक्षेत्रात जितका यशस्वी ठरला, तितकाच शालेय शिक्षणातही गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखला जाऊ लागला.
योगक्षेत्रातील यशासाठी शिस्तबद्ध दिनचर्या, नियंत्रित आहार आणि नियमित सराव आवश्यक असतो. विधीशने हे सर्व नियम अत्यंत प्रामाणिकपणे पाळले. त्याच्या चेहऱ्यावरील कायमचे हास्य, नम्र स्वभाव आणि समजूतदारपणा यामुळे तो सर्वांचा लाडका विद्यार्थी बनला.
जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास, निवास आणि अन्य खर्चाचा मोठा भार कुटुंबावर पडत होता. मात्र विधीशचे आई-वडील जयेश राऊत आणि कृपाली राऊत यांनी आर्थिक अडचणींना मुलाच्या स्वप्नांच्या आड कधीच येऊ दिले नाही. विशेष म्हणजे अनेकदा स्पर्धेच्या खर्चासाठी स्वतःला मिळालेली बक्षिसांची रक्कम वापरण्याचा सल्ला विधीशच देत असे. त्याची ही समजूतदार वृत्ती आणि ध्येयाप्रती असलेली बांधिलकी त्याच्या यशाचे मोठे कारण ठरली.
विधीशच्या कर्तृत्वाची मालिका राज्यस्तरावरच थांबली नाही. लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये त्याने १४ वर्षांखालील गटात ट्रॅडिशनल योगासन आणि आर्टिस्टिक योगासन या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावली. याशिवाय ‘बेस्ट ऑफ द बेस्ट प्लेयर’ हा बहुमानही मिळवला. या कामगिरीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्यानंतर संगमनेर येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशिप २०२५ मध्ये लेग बॅलन्स योगासन प्रकारात सुवर्णपदक जिंकत त्याने जागतिक योगासन चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली. याच यशामुळे पालघर जिल्ह्याच्या योगक्षेत्रात त्याचे नाव विशेषत्वाने घेतले जाऊ लागले.
अलीकडेच त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत विधीशने ट्रॅडिशनल योगा प्रकारात संपूर्ण देशातून द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले. राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय यशामुळे त्याच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
याच काळात योगासन भारत आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत लेग बॅलन्स प्रकारात सुवर्णपदक जिंकून त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर झालेल्या पहिल्या जागतिक योगसाधना स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत त्याने आपल्या यशाचा सुवर्ण अध्याय लिहिला.
विधीशच्या या यशामागे त्याचे आई-वडील, प्रशिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था तसेच पालघर जिल्हा योगासन असोसिएशन यांचेही मोलाचे योगदान आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि विश्वास यामुळेच हा विद्यार्थी राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर चमकू शकला.
आज विधीश राऊतची कहाणी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मोठ्या सुविधा किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ जिद्द, परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हे त्याने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.
एका सामान्य कुटुंबातील या असामान्य विद्यार्थ्याने मिळवलेले सुवर्ण यश हे केवळ त्याचे वैयक्तिक यश नसून पालघर जिल्ह्याच्या क्रीडा आणि योग क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.
नवयुग पालघर तर्फे विधीशचे मनापासून अभिनंदन !
( माहिती आणि छायाचित्रे सहकार्य : मा. मुख्याध्यापिका मधुमती उन्मेष कुलकर्णी )