ई-मार्केट प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला बचत गटांची क्षमता बांधणी

Date: 2026-01-08
news-banner
ई-मार्केट प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला बचत गटांची क्षमता बांधणी

https://youtu.be/kgMzMPNlSXE?si=ymam4-Uz1-eUOTue

पालघर — “ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दर्जेदार पॅकेजिंग, प्रभावी ब्रॅण्डिंग आणि नियमबद्ध लेबलिंग मिळाल्यास ई-मार्केट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असा विश्वास देत, महिला उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन व प्राइमोव्ह (PriMove) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना डिजिटल माध्यमातून व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ही कार्यशाळा २३ व २४ डिसेंबर रोजी पार पडली.
             कार्यशाळेमध्ये प्राइमोव्ह (PriMove) संस्थेचे सागर सावंत आणि विक्रांत सोनी यांनी महिलांना ई-मार्केट प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी कशी नोंदवावीत, उत्पादन सादरीकरण कसे करावे, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर कसा करावा याबाबत सखोल प्रशिक्षण दिले. 
          या प्रशिक्षण कार्यशाळेस उमेद अभियानाच्या प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा व्यवस्थापक रवि बोबडे, राजश्री माने, तसेच जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील महिला उद्योजक आणि महिला बचत गटांच्या सदस्यांनी आपल्या उत्पादनासह या प्रशिक्षणात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
              दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये महिलांनी तयार केलेल्या विविध ग्रामीण उत्पादनांचे प्रकार, त्यासाठी आवश्यक योग्य पॅकेजिंग साहित्य, आकर्षक व नियमबद्ध लेबल तयार करण्याच्या पद्धती, उत्पादनाची माहिती ई-मार्केट प्लॅटफॉर्मवर नोंदविण्याची प्रक्रिया, तसेच अन्न प्रक्रिया व घरगुती उत्पादनांसाठी आवश्यक असलेले विविध शासकीय परवाने, नोंदणी प्रक्रिया आणि कायदेशीर बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Leave Your Comments