“वंदे मातरम् हे स्वातंत्र्यभावनेचा शक्तिस्रोत” — जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड

Date: 2025-11-08
news-banner
*“वंदे मातरम् हे स्वातंत्र्यभावनेचा शक्तिस्रोत” — जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड..........*

**गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात **

https://youtu.be/IjHMXJ1Kg1E?si=Dw0Bkk5UO90zaVGx

पालघर, ७ ऑक्टोबर : “वंदे मातरम् हे गीत केवळ एक गीत नसून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा आत्मा आहे. त्यातील प्रत्येक ओळ मातृभूमीप्रेम, एकात्मता आणि बलिदानाची शिकवण देते. वंदे मातरम् हे गीत म्हणजे स्वातंत्र्याच्या भावनेचा शक्तिस्रोत आहे,” अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, विविध विभागांचे उपजिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, आयटीआय आणि शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. जाखड यांनी वंदे मातरम् या गीताच्या इतिहासाचा आढावा घेत , बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या आनंदमठ कादंबरीत जन्मलेले हे गीत पुढे स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख प्रेरणास्रोत बनल्याचे सांगितले.
१८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेस अधिवेशनात प्रथम गायलेले हे गीत, १९०५ च्या बंगाल फाळणीविरोधी आंदोलनात आंदोलनाचे प्रतीक ठरले. परदेशात पहिला तिरंगा फडकवताना मॅडम भिकाजी कामा यांनी ध्वजावर ‘वंदे मातरम्’ हेच शब्द लिहिले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

यासोबतच, संविधान सभेत १९५० मध्ये राष्ट्रगीताबरोबरच या गीताला समान सन्मान देण्याचा प्रस्ताव तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जाहीर केला, हा इतिहास डॉ. जाखड यांनी उपस्थितांना सांगितला.

त्या म्हणाल्या, “आजची तरुण पिढी वंदे मातरम् चे सुरुवातीचे शब्द ओळखते, पण त्याचा संपूर्ण अर्थ, इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका जाणून घेणे अत्यावश्यक आहे. हा कार्यक्रम म्हणजे इतिहासाचे पुनर्स्मरण नसून देशभक्तीच्या भावनेचा पुनर्जन्म आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी लघुनाटिका आणि वंदे मातरम् च्या सामूहिक गायनाने झाली.

Leave Your Comments