पालघरमध्ये ‘किरणोत्सर्ग आपत्कालीन रुग्णालय’ उभारण्याची लोकसभेत मागणी

Date: 2026-04-08
news-banner
नवयुग पालघर 

**पालघरमध्ये ‘किरणोत्सर्ग आपत्कालीन रुग्णालय’ उभारण्याची लोकसभेत मागणी**


          पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या पाश्र्वभूमीवर संभाव्य अणु-आपत्कालीन परिस्थितीचा वेगाने आणि प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्ह्यातच २०० खाटांचे सुसज्ज ‘रेडिएशन आपत्कालीन रुग्णालय’ उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी खासदार हेमंत विष्णू सवरा यांनी लोकसभेत केली आहे. ‘नियम ३७७’ अंतर्गत त्यांनी केंद्रीय गृह तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे लक्ष या तातडीच्या विषयाकडे वेधले.
            खासदार सवरा यांनी मांडलेल्या निवेदनात नमूद केले की, तारापूर अणुऊर्जा केंद्र हे देशातील पहिले अणुऊर्जा केंद्र असून, त्याच्या संवेदनशीलतेमुळे परिसरात विशेष आपत्कालीन आरोग्य यंत्रणा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही संभाव्य किरणोत्सर्ग (रेडिएशन) किंवा अणु-आपत्कालीन प्रसंगी तातडीने उपचार मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
         फेब्रुवारी २०२६ मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयोजित बैठकीत अणुप्रकल्पांच्या परिसरात आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला होता, याचीही त्यांनी यावेळी आठवण करून दिली.
           सध्या अशा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी मुंबई येथे हलवावे लागते. मात्र, या प्रवासात होणारा वेळेचा अपव्यय रुग्णांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकतो, असेही त्यांनी अधोरेखित केले.
       ही गैरसोय टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातच अंदाजे २०० खाटांचे ‘समर्पित किरणोत्सर्ग(रेडिएशन) आपत्कालीन रुग्णालय’ उभारण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी व आर्थिक तरतूद तातडीने करण्यात यावी, अशी मागणी खासदार सवरा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Leave Your Comments