https://youtu.be/EGO3y9ulvLs?si=FLbw6KOvvnLk8PIY
गुरुचरण जमिनीत परवानगीशिवाय उत्खनन व ब्लास्टिंग; जीआर इन्फ्रा कंपनीवर कारवाईची मनसेची मागणी
पालघर, ०८ ऑक्टोबर : पालघर तालुक्यातील मौजे विराधन खुर्द येथील सर्वे क्र. ६०/अ/६ या ५४.४८.०० हे. गुरुचरण जमिनीत जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने स्थानिक ग्रामपंचायत व महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने परवानगीशिवाय अतितीव्र विस्फोटक वापरून मोठ्या प्रमाणात गौण खनिज मुरूम उत्खनन करून शासनाची महसुली फसवणूक केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. याबाबत पक्षाचे उपजिल्हा संघटक मंगेश घरत हे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
📝 गंभीर गैरव्यवहारांचा आरोप
तक्रारीनुसार, जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड ही मुंबई–वडोदरा दुतगती महामार्गाचे काम करणारी कंपनी असून, तिचे प्रतिनिधी विशाल अग्रवाल यांनी विराधन खुर्द ग्रामपंचायत व मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने गुरुचरण जमिनीत परवानगीशिवाय जिलेटीन कांड्यांच्या साहाय्याने ब्लास्टिंग करून उत्खनन केले.
प्रत्यक्ष पाहणीतही या जागेवर बेकायदेशीर ब्लास्टिंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विस्फोटक विभागाची कोणतीही परवानगी नसतानाही अशा प्रकारे ब्लास्टिंग केल्याने मानवी जीवन, पर्यावरण आणि देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे मनसेने नमूद केले आहे.
🧾 खोट्या कागदपत्रांद्वारे परवानग्या मिळवल्याचा आरोप
२०११ च्या शासकीय तरतुदींनुसार गुरुचरण जमिनीतून गौण खनिज उत्खननास परवानगी नसतानाही, कंपनीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खोटे प्रतिपादन केले की जमिनीवर जुना तलाव आहे व 'पाणी अडवा पाणी जिरवा' योजनेअंतर्गत खोलीकरणासाठी परवानगी मागितली.
ग्रामपंचायत व काही महसूल अधिकाऱ्यांच्या बनावट पंचनामे, खोटे अहवाल आणि दिशाभूल करणारे इतिवृत्त यांच्या आधारावर परवानग्या मिळवून कंपनीने हजारो ब्रास मुरुम, माती व दगडाचे उत्खनन केले असल्याचा आरोप आहे.
गाव नकाशा व महसूल नोंदींनुसार संबंधित जागेवर कोणताही तलाव अस्तित्वात नसल्याचे गावकऱ्यांनी लेखी दिल्यानंतरही कारवाई झाली नसल्याचेही पत्रात नमूद केले आहे.
📌 मनसेच्या मागण्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत :
1. विस्फोटक परवानगीशिवाय ब्लास्टिंग केल्याबद्दल जीआर इन्फ्रा कंपनी व प्रतिनिधी विशाल अग्रवाल यांच्यावर भारतीय न्यायसंहिता व विस्फोटक अधिनियमांनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
2. खोट्या पद्धतीने मिळविलेल्या परवानग्या व रॉयल्टी रद्द करून, गौण खनिज नियम २०१३ अंतर्गत कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी.
3. शासन महसूल चोरीबद्दल कंपनीवर फौजदारी कारवाई करावी.
4. जमिनीतील ५० फूट खोल उत्खननामुळे पर्यावरणीय व कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी.
5. खोटे इतिवृत्त व ठराव तयार केल्याबद्दल विराधन खुर्द ग्रामपंचायतीवर कारवाई करावी.
6. खोटे पंचनामे देणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर चौकशी नेमून कठोर कारवाई करावी.
7. खनिकर्म विभागातील अधिकारी यांनी संगनमताने महसुली नुकसान केल्याप्रकरणी भ्रष्टाचार व गैरवापराच्या कलमांनुसार कारवाई करावी.
⚠️ आक्रमक आंदोलनाचा इशारा
मनसेने निवेदनात इशारा दिला आहे की, संबंधित सर्व प्रकरणावर तातडीने कारवाई न झाल्यास पक्ष आक्रमक भूमिका घेईल. शासनाने महसुली चोरी, खोट्या कागदपत्रांचा वापर, पर्यावरणीय हानी व जनजीवनाला धोका या सर्व बाबींना गांभीर्याने घेत तातडीने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.