स्थलांतरित व वंचित मुलांसाठी शिक्षणाचा पूल; पालघरमध्ये दोन टप्प्यांत ३७ मुलांचा शाळा प्रवेश
पालघर :
पालघर जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि स्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून दोन वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण ३७ शाळाबाह्य मुलांना अधिकृतपणे शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यात आले असून, त्यांना गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्पर्श फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या रजई वाटप उपक्रमादरम्यान पालघर येथील आरोग्यम रुग्णालय परिसरात स्थलांतरित व वंचित कुटुंबांतील शाळाबाह्य मुले निदर्शनास आली. या बाबत २९ नोव्हेंबर रोजी फाउंडेशनने जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर स्पर्श फाउंडेशनने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सादर केलेल्या २३ मुलांची मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) व्यंकटराव हुंडेकर व फाउंडेशनच्या अध्यक्ष रुतू संखे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन मुलांची वास्तव्यस्थिती, शालेय गरज व पालकांची भूमिका तपासली. यानंतर २९ डिसेंबर २०२५ रोजी १२ मुलांना नाना-नानी पार्कजवळील अंगणवाडीत, तर १४ मुलांना जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये दाखल करण्यात आले.
पुढील टप्प्यात स्थलांतरित बांधकाम कामगारांच्या कुटुंबांतील १४ मुलांना जिल्हा परिषद शाळा, आनंदाश्रम येथे प्रवेश देत जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेश वितरित करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते, बिट विस्तार अधिकारी नीलम पष्टे, केंद्रप्रमुख विनोद पाटील, स्पर्श फाउंडेशनचे पदाधिकारी, बांधकाम कामगार पालक व नव्याने शाळेत दाखल झालेले विद्यार्थी उपस्थित होते.
“जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांसाठी अशा मोहिमा अधिक व्यापक व गतिमान करण्यात येतील,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी यावेळी स्पष्ट केले.