छत्रपती संभाजीनगर | ९ जानेवारी २०२६
पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांच्या शैक्षणिक नेतृत्व, संशोधनवृत्ती आणि प्रशासकीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद आणि प्रा. डॉ. नवनाथ रासकर यांच्या सौजन्याने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या ४१व्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ तत्त्वज्ञान-अभ्यासक डॉ. मोहनराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ८ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत हे अधिवेशन भरले असून, या समारंभास मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, आयसीटी मुंबईचे कुलगुरू पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी, पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. आनंद अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉ. किरण सावे यांना सन्मानित करण्यात आले.
1डॉ. सावे यांच्या व्यासंग, जिज्ञासा, संशोधनाभिमुख दृष्टी, प्रभावी प्रशासकीय कामकाज तसेच लेखनकार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विशेष म्हणजे, डॉ. किरण सावे यांना नुकताच मुंबई विद्यापीठाचा ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’ देखील प्राप्त झाला असून, सलग मिळालेल्या या मान्यतेमुळे पालघर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीस नवे बळ मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.