आंबिस्ते आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या; परिसरात खळबळ
पालघर : वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यामुळे पालक आणि प्रशासन धास्तावले आहे.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे देविदास परशुराम नावळे (रा. बिवळपाडा, मोखाडा) व मनोज सिताराम वड (रा. दापटी, मोखाडा) अशी आहेत. देविदास इयत्ता दहावीत तर मनोज इयत्ता नववीत शिकत होता.
आंबिस्ते येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेत ५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. गुरुवारी सकाळच्या सुमारास शाळेच्या परिसरातील झाडाला कपडे सुकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोरीच्या सहाय्याने या दोघा विद्यार्थ्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांचे मृतदेह आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास वाडा पोलीस करीत आहेत.
दरम्यान, जव्हार प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी आश्रमशाळा प्रशासन व पोलिसांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.
या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, देखरेख आणि आश्रमशाळांतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पालक आणि प्रशासनही धास्तावले आहे.